इथला पाऊस नक्की अनुभवा!

ओंकार ओक
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा
 

पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवरची एक अजस्र डोंगररांग! इथल्या कड्यांची रौद्रता आणि तिथून खाली दिसणाऱ्या दरीच्या खोलीचा नुसता अंदाज जरी घेतला, तरी बघणाऱ्याचे डोळेच फिरावेत. या बेलाग कडेकपाऱ्यांना कोंदण लाभलेय ते गहिऱ्या निसर्गाचे आणि रानवेड्या पाऊलवाटांचे! 

आहुपे हे त्या आगळ्यावेगळ्या दुनियेचे नाव! खाली पाहिल्यावर कोकणातले लोभसवाणे खोपिवली गाव आणि त्याच्या शेजारी एखाद्या ध्यानस्थ योग्यासारखे भासणारे गोरख मच्छिंद्रचे बुलंद सुळके. सोबतीला असतो घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाज. त्याच्या तालावर डोलणारा हिरवाकंच आसमंत. उंच कड्यावरून स्वत:ला दरीत झोकून देणारे पांढरेशुभ्र धबधबे. नशीबवान असाल, तर समोर अलगद उमटणारे इंद्रधनुष्य आणि हे दृश्‍य वेडावून पाहणारे आपण सह्याद्रीमित्र! 

जून उजाडला की बेभानपणे कोसळणाऱ्या पावसाची वाट बघत आकाशाकडे डोळे लावून बसलेले निसर्गप्रेमी वळतात ते वर्षाऋतूत चिंब भिजून निघालेल्या घाटांकडे आणि निसर्गरम्य ठिकाणांकडे! पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारे अनेक घाट आहेत. पण पर्यटकांचा अत्यंत लाडका घाट म्हणजे ताम्हिणी घाट. पुण्याहून पौड मुळशी मार्गे ताम्हिणीच्या रस्त्याला लागले, की सुरू होते चारही बाजू व्यापून टाकलेल्या हिरव्याकंच निसर्गाचे साम्राज्य. मुळशी धरणाचा अथांग फुगवटा, त्याच्या मागे पसरलेली कैलासगड किल्ल्याच्या परिसरातली डोंगररांग, डावीकडे निसर्गाच्या कुशीत वसलेले चिंब ताम्हिणी गाव आणि पर्यटकांबरोबरच साहसप्रेमींना खुणावणारी प्लस व्हॅली! एखाद्या स्वप्नात दिसावे असे हे दृश्‍य. ताम्हिणी घाटातले धबधबे हे तर पर्यटकांचे हक्काचे ठिकाण असल्याने पावसाळ्यात इथे निसर्गप्रेमी आणि उत्साही मंडळींची भाऊगर्दी होते. ताम्हिणीतून लोणावळ्याला जाणाऱ्या रस्त्यावर लागणारे नितांत सुंदर पिंपरी गाव आणि तिथे असणारा कुंडलिका दरीचा नजरा अत्यंत देखणा असून जवळच घनगड व तैलबैला हे गिरिदुर्ग आहेत. पण पुरेसा अनुभव व मार्गदर्शनाशिवाय पावसाळ्यात हे किल्ले थोडे अनगड असल्याने यांचा मोह टाळावा. ताम्हिणीच्या रस्त्यावर सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा प्रवास आपापल्या जबाबदारीवरच करणे इष्ट आहे.

पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारे एक अतिशय सुंदर ठिकाण म्हणजे वरंध घाट. पुण्याहून भोर-निगुडघर-हिर्डोशी मार्गे वरंध घाटाचा होणारा प्रवास हा वेड लावणारा आहे! पुण्याहून भोरला जाताना वाटेत दिसणारे नीरा नदीच्या नेकलेस पॉइंटपोई दृश्‍यपण अतिशय सुंदर असून जवळच भाटघरचे प्रसिद्ध धरणही पाहायला मिळते. पुढे नीरा देवघर धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेकडेने जाणारा ‘ड्राईव्ह’ कमालीचा देखणा असून साधारणपणे हिर्डोशी गावाच्या पुढे रस्त्याच्या कडेने अनेक धबधबे सुरू होतात. वरंध घाटाचे सुरेख दृश्‍य बघायला मिळते ते धारमंडप गावापासून. कोकणात खोल गेलेले सह्याद्रीचे कडे, त्यांचा ढगांशी चालणारा लपंडाव, इतिहासप्रसिद्ध कावळ्या किल्ला व त्याच्या न्हावीणे सुळक्‍याचे दिसणारे हिरवेगार दृश्‍य, सर्पाकृती सळसळत गेलेला वरंध घाटाचा रस्ता आणि जिथे आपण रायगड जिल्ह्यात प्रवेश करतो तो प्रसिद्ध ‘भजी पॉइंट’ हे दृश्‍य कॅमेऱ्यात टिपताना भान हरपते! भजी पॉइंटवरून समोरच्या दरीत दिसणारे दोन मोठे धबधबे हा तर या सगळ्यावर निसर्गाने चढवलेला कळसच! हातातल्या आल्याच्या वाफाळत्या चहाचा आस्वाद घेताना आणि कोसळणाऱ्या पावसात गरमागरम कांदाभजी शब्दश: हादडताना हे दृश्‍य डोळ्यासमोर असणे यासारखे सुख नाही. वरंध घाटातून कोकणात उतरल्यावर पुढे समर्थ रामदास स्वामींनी जिथे दासबोध लिहिला ती अतिशय प्रसिद्ध शिवथरघळ असून वरंध घाट उतरून गेल्यावर पुढे बारसगाव फाटा आहे. तिथून शिवथरघळीकडे जाणारा रस्ता असून शिवथरघळीचा धबधबाही अतिशय प्रसिद्ध आहे. 

‘गिरीचे मस्तकी गंगा तेथून चालली बळे, 
धबधबा लोटती धारा... धबाबा तोय आदळे’ 

हे समर्थांचे शब्द सार्थ ठरवणारी ही जागा! शिवथरघळ हे अत्यंत पवित्र ठिकाण असून इथे वावरताना प्रत्येकाने त्या जागेचे पावित्र्य कायम राहील याची खबरदारी घेणे अतिशय आवश्‍यक आहे. 

पुण्याहून कल्याण-मुरबाड येथे उतरणारा माळशेज घाट तसा सगळ्यांच्या परिचयाचा, पण सातवाहन कालीन नाणेघाटाला मात्र आत्ता कुठे थोडी प्रसिद्धी मिळू लागली आहे. नगर-कल्याण या व्यापारी मार्गाला जोडणारा हा अतिशय पुरातन घाटमार्ग. नाणेघाटाच्या गुहा व तेथील सातवाहन कालीन ब्राह्मी भाषेतील शिलालेख इतिहास अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध असून जवळच्या जीवधन किल्ल्यावर ट्रेकर्सची रीघ लागलेली असते. नाणेघाटातला नानाचा अंगठा हा आभाळात घुसलेला सुळका म्हणजे अंगावर येणारा हलका पाऊस झेलण्याचे उत्कृष्ट ठिकाण! पुण्याहून नाशिक हायवेने जाताना लागणाऱ्या नारायणगावपासून जुन्नरला गेले, की तिथून आपटाळे मार्गे नाणेघाट सुमारे ४० किलोमीटरवर आहे. जुन्नर येथील अतिशय पवित्र असणारे शिवजन्मस्थळ अर्थात किल्ले शिवनेरी हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मानाचे पान! जुन्नरपासून नाणेघाटात जाणारा रस्ताही असाच हिरवाईने नटलेला. आपटाळे गावानंतर उजवीकडे दिसणारा चावंड किल्ला व त्याच्या जवळच असणारे कुकडेश्वराचे पुरातन देवस्थान हेही प्रेक्षणीय आहे. नाणेघाटाच्या शेजारी असणारे अंजनावळे गावचे वऱ्हाड सुळके हे प्रस्तरारोहकांसाठी एक अनोखे आव्हान समजले जाते. नाणेघाटात माळशेज घाटाच्या शेवटाशी असलेल्या वैशाखरे गावातून येण्यासाठी पायी मार्ग असून इथून आल्यास नाणेघाटाची पुरातन वाट अनुभवता येते. नाणेघाटाच्या तोंडाशी पूर्वी दळणवळणासाठी जो कर घेतला जात असे तो साठवण्यासाठी उपयोग केला जाणारा पुरातन दगडी रांजण असून इतिहासाची ही सुवर्णपाने नक्कीच अनुभवण्यासारखी आहेत. नाणेघाटातील जीवधन किल्ला मात्र अनुभवी ट्रेकर्ससाठीच असून नवख्या पर्यटकांनी याची कास पावसाळ्यात न धरलेलीच बरी. नाणेघाटात सध्या रिसॉर्ट झाले असून तिथे जेवण व राहण्याची सोय होऊ शकते. 

लोणावळ्याजवळची प्रसिद्ध सहारा सिटी सर्वांनाच परिचित आहे. पण तिच्याच डोईवर असणारा कोरीगड किंवा कोराईगड हा किल्ला मात्र खूप कमी पर्यटकांना ठाऊक असेल. कोरबारस या नावाने प्रसिद्ध असणारा हा इतिहासकालीन मुलूख. लोणावळ्यातून भुशी डॅम-घुसळखांब मार्गे पायथ्याचे पेठ शहापूर हे गाव गाठले, की धुक्‍यातून हळूच डोकावणारा कोरीगड किल्ल्याचा कडा नजरेत पडतो. कोरीगड किल्ल्याच्या माथ्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असून ट्रेकिंगचा थोडाफार अनुभव असल्यास हा किल्ला सहज चढता येऊ शकतो. वाटेवर लागणारे गणपतीचे मंदिर, पाण्याचे मोठे गुहाटाके आणि सर्वांत शेवटी लागणारा गडाचा सुस्थितीतील दरवाजा हे नक्की बघण्यासारखे आहेत. कोरीगडाला विस्तीर्ण पठार लाभले असून त्याच्या कोवळ्या हिरव्या गालिच्यावरून पायपीट करण्याची गंमत अतिशय सुंदर आहे. कोरीगडावर पाण्याची मोठी तळी असून गडावर गडदेवता कोराईदेवीचे मंदिर, शिवमंदिर, बांधकामाचे अवशेष, तोफा, एकसलग असणारी भक्कम तटबंदी, आंबवणे गावाकडून येणारा दरवाजा हे सर्व अवशेष नक्की बघण्यासारखे आहेत. कोरीगड किल्ल्यावरून वातावरण स्वच्छ असल्यास दिसणारा लोणावळ्याचा परिसर, रायगड जिल्ह्याचा सुरेख नजारा, पायथ्याशी वसलेली सहारा सिटी व ढगांशी लपंडाव खेळणारा हिरवागार आसमंत हे तर नक्की अनुभवण्यासारखे. इथे वावरताना एक काळजी मात्र प्रत्येकाने नक्की घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व किल्ले हे आपल्या अस्मितेची मंदिरे असून त्यांचे पावित्र्य राखणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. जिथे शिवरायांची पावले लागली आहेत त्या स्थळांवर जाऊन मद्यपान करणे, ब्ल्यूटूथ स्पीकरवर गाणी लावणे, मोठमोठ्याने ओरडणे, सिगारेट ओढणे किंवा हुल्लडबाजी करणे हे प्रकार चुकूनही करू नयेत. 

पिकनिक किंवा मौजमजा करण्याची इतर अनेक ठिकाणे आपल्या आजूबाजूला असून तिथे पर्यटक मजा करण्यासाठीच जात असतात. किल्ल्यांवर किंवा ऐतिहासिक स्थळी हे प्रकार केल्यास दुर्धर प्रसंग ओढवू शकतात. त्यामुळे परिस्थितीचे, इतिहासाचे व स्वत:चे भान राखूनच महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जावे. 

पावसाळ्यामध्ये भटकंती करणे हा एक स्वर्गीय आनंद आहे. पण त्याच्याबरोबर येते ती एक अतूट जबाबदारी. महाराष्ट्र शासनाने व स्थानिक ग्रामस्थांनी या सगळ्या गडकिल्ल्यांवर व पर्यटन स्थळांवर वाढलेल्या अमर्याद गर्दीमुळे व तेथील पर्यटकांनी केलेल्या दूषित वातावरणामुळे अनेकांना चाप बसवायला सुरुवात केली असून हुल्लडबाजी अथवा कोणतेही गैरप्रकार केल्यास कायद्याच्या कचाट्यात अडकण्याशिवाय गत्यंतर नाही, याचे भान कटाक्षाने बाळगणे गरजेचे आहे. तसेच अनुभव नसताना तळ्यात पोहायला उतरणे, खोल दरीत उतरण्याचा प्रयत्न करणे किंवा कड्याच्या टोकाशी जाऊन ‘सेल्फी’ काढणे या प्रकारांमुळे अनेक पर्यटकांनी आपले जीव अत्यंत वाईटरीत्या गमावले आहेत. तसेच त्या ठिकाणाची शिस्त व पावित्र्य मोडल्याने स्थानिकांबरोबर होणाऱ्या वादाचे रूपांतर जीवघेण्या प्रसंगात झाल्याचे अनेक दाखले आहेत. त्यामुळे आपण फिरायला जाताना एक सामाजिक शिस्त न बाळगल्यास कायमचा लक्षात राहील असा एखादा अघटित प्रसंग घडू शकतो. 

वर्षाऋतू हा नितांत सुंदर व सुरक्षितरीत्या आनंद घेण्याचा ऋतू आहे. त्याचे भान राखूनच व निसर्गाचा आदर मनात बाळगूनच ही ठिकाणे जवळ करावीत... मग बघा... निसर्ग त्याची गहिरी रूपे तुम्हाला कशी उलगडून दाखवतो ते!

संबंधित बातम्या