कामाच्या ठिकाणी स्वस्थता हवी 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
गुरुवार, 5 एप्रिल 2018

हितगूज

कुठलीही व्यक्ती आनंद आणि मन:शांती या दोन शब्दांसाठी जगत असते. या गोष्टी मिळवण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकेल, या शब्दांची व्याख्या वेगवेगळी असू शकेल. पण जन्म व मृत्यू दरम्यानचा माझा पृथ्वी या ग्रहावरचा प्रवास स्वस्थ आणि सुखावह कसा होईल यासाठी सगळा अट्टहास असतो. मग 'मी' स्वस्थ असणे, माझे कुटुंब स्वस्थ असणे, मी जिथे अर्थार्जनासाठी काम करतो तिथे स्वास्थ्य असणे हे महत्त्वाचे ठरते. किंबहुना मी जिथे काम करतो ती कंपनी असो, सरकारी कार्यालय असो किंवा कुठलीही संस्था. मी म्हणजे माझ्या आतला ‘मी’ स्वस्थ स्थिर, शांत, आनंदी असेन तरच माझे सहकारी, वरिष्ठ किंवा कनिष्ठांबरोबरचे नाते माझ्यासाठी सौहार्दाचे असू शकते. मग माझा उत्साह, आत्मविश्वास, माझे कामातले योगदान, आणि समाधान वगैरे सगळ्याच गोष्टी जमून येतात. आता ‘मी’ स्वस्थ होणे, असणे हे माझ्या संस्थेतल्या वर पासून खालपर्यंत प्रत्येकाचीच गरज ठरते. म्हणूनच हा "मी" तणावरहित, स्वस्थ आणि म्हणूनच अधिक कार्यक्षम कसा होईल, त्याच बरोबर माझा एकूण जीवनाकडे, समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. 

‘मनाचं स्वास्थ्य’ ही गोष्ट व्यक्ती, कुटुंब, माझे अर्थार्जनाचे ठिकाण (कंपनी, संस्था इ.) आणि एकूणच समाज या सगळ्यांच्या अवकाशात महत्त्वाची ठरते. कारण त्यावर व्यक्ती व्यक्तींमधील नात्यातला (interpersonal relations) सुसंवाद, वातावरणातील सहजता, मोकळेपणा ठरतो. प्रथम आपण तणावरहित का आणि कसे व्हायचे हे पाहू. ताणतणावाचे नियोजन आणि अस्वस्थतेचे निर्मूलन ही त्याची पहिली पायरी ठरते. 

प्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, रिऍक्‍ट होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे ताणतणावाचे शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते. पण शेवटी तणावामुळे शरीरात होणाऱ्या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतातच. त्याच बरोबर मेंदूतील serotonin आणि norepinephrine या neurotransmitters मध्ये असंतुलन निर्माण होते. ज्यामुळे अस्वस्थतेच्या आजाराला निमंत्रण मिळते . याची शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीतील लक्षणे दिसायला लागतात, ज्याची नोंद वेळेवर घेणे महत्त्वाचे असते. आज कॉर्पोरेट, मीडिया आणि सर्वच क्षेत्रांमध्ये ताणतणावाचे नियोजन न करता आल्यामुळे अस्वस्थतेच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे. 

बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये कर्मचाऱ्यांवर अपरिमित ताणतणाव असतात. या ताणाचे स्रोत विविध प्रकारचे असतात. व्यक्तिगत, कौटुंबिक, डिपार्टमेंटअंतर्गतचे, राजकीय, सामाजिक आणि समाजव्यवस्थेचे. त्यातच अनियमित ड्युटीच्या वेळा, जेवणाच्या वेळा, जागरणे, सततची जागृत राहण्याची मेंदूची सवय आणि ताणाचा निचरा व्यवस्थित न होणे हे प्रश्न असतात. या ताणाचे परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या केडरमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ताण निर्माण होतो. या ताणामुळे जी अस्वस्थता निर्माण होत राहते त्याचे परिणाम शरीर आणि मनावर निश्‍चितपणे होतात. वेळीच जर यावर उपाय झाले नाहीत तर वेगवेगळे शारीरिक, मानसिक आजार होण्यात त्याची परिणीती होते. सततच्या अस्वस्थतेमुळे वाटणारी सुरवातीची, शारीरिक व मानसिक लक्षणे पुढील प्रमाणे असतात. सतत अस्वस्थ वाटत रहाणे, लहान सहान कारणांवरून होणारी चिडचिड. राग अनावर होणे, झोप न येणे किंवा जास्ती येणे, अनामिक भीती वाटत राहाणे, भूक न लागणे किंवा अतिभूक लागणे, विनाकारण संशय येणे, एकाग्रता न होणे, विचारांमध्ये गोंधळ व निर्णय घेता न येणे, विलक्षण थकवा वाटणे, वारंवार पोट बिघडणे, निराश वाटत राहणे, आत्मविश्वास कमी होणे, जगण्यातील आनंद कमी होणे, इत्यादी. या आणि अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास नैराश्‍याचा आजार किंवा एखादा शारीरिक आजार होऊ शकतो. Cortisol आणि इतर ताणतणावाशी निगडित संप्रेरके अतिरिक्त प्रमाणात स्त्रवतात व त्यामुळे इतर शारीरिक अवयवांच्या चयापचय क्रियेवर विपरीत परिणाम होतो.त्यातून अतिरक्तदाब, हृदयविकार, पचनसंस्थे संबंधातले विकार आजार उद्‌भवू शकतात. Neuroimmunology या शास्त्र शाखेच्या निष्कर्षांनुसार बहुतेक शारीरिक आजाराचे मूळ हे खूप काळ सहन केलेल्या मानसिक ताण तणावात असते. तसेच या सर्व लक्षणांची परिणाम हा कार्यक्षमता कमी होणे, व्यसनाधीनता वाढणे, कामावरची गैरहजेरी वाढणे इत्यादी गोष्टींमध्ये होते. या ताणतणावाचे नियोजन कसे करायचे, एक कणखर परंतु शांत, स्वस्थ मन:स्थिती निर्माण करता येईल का? त्यासाठी काय करावे लागेल? त्यासाठी पुढील पायऱ्यांमध्ये काम करावे लागेल. आवश्‍यक वाटल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल. 

 ताण समजून घेणे व त्यांची नोंद करणे : आपल्यावर सध्या कुठले ताण आहेत? कुठल्या गोष्टींची काळजी वाटत राहाते? कसली भीती वाटते? कशामुळे राग येतो? तो ताब्यात राहतो का? कशामुळे वाईट वाटते? कुठला अपराधगंड वाटत राहतो का? शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे, अशा अनेक गोष्टींची नोंद करावी. थोडक्‍यात हे एक प्रकारचे भावनांचे ऑडिट असेल. तज्ज्ञांच्या साहाय्याने त्यावरचे उपाय शोधावेत. तज्ज्ञांशी बोलल्यामुळे ताणाचा निचरा व्हायला मदत होईल. 

 उपाययोजना व आवश्‍यक असल्यास औषधोपचार, थेरपीज : एकदा तणावाचे मूळ तसेच अस्वस्थतेच्या आजाराचे स्वरूप लक्षात आले, की आवश्‍यक असल्यास तज्ज्ञांनी सुचवलेली औषधे घेणे आणि आवश्‍यक त्या सायकोथेरपी, समुपदेशन , तणाव नियंत्रणाची, मन:स्वास्थ्याची तंत्रे शिकणे व या सर्वांचा विशिष्ट कालावधीपर्यंत उपयोग करणे महत्त्वाचे आहे. 

 व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यान व वर्तमान क्षणात राहण्याची तंत्रे : रोज चल पद्धतीचा (Aerobics) व्यायाम म्हणजे ज्या योगे नाडीची गती ठराविक मर्यादेपर्यंत वाढेल (त्याचा फॉर्मुला हा २२० वजा आपले वय. उत्तराच्या दोन तृतीयांश एवढी मिनिटाला वाढवणे. उदा. वय चाळीस असेल तर २२० - ४० = १८० च्या म्हणजे नाडीची गती मिनिटाला १२० पर्यंत वाढवणे, व ती वीस मिनिटे टिकवणे.) म्हणजे तेवढ्या वेगात चालणे, धावणे, पोहणे इत्यादी. यामुळे शरीरात serotonin, endorphins तसेच इतर नैसर्गिक anti depressants स्त्रवतील. तसेच प्राणायाम, ध्यानाच्या काही पद्धती, श्वासावर आधारित ध्यान, क्षणसाक्षीत्वाची (mindfulness ), वर्तमान क्षणात राहण्याची तंत्रे शिकून घेणे. 

 संगीत, कविता, छंद आणि मैत्री : संगीत हे एक उत्तम औषध आहे. मन:स्थिती सुधारण्यासाठी रोज संगीताची साधना, आवडते संगीत रोज ऐकणे, कविता वाचणे, ऐकणे, आवडता छंद जोपासणे याची खूप मदत होते. तसेच ज्याच्यापाशी मोकळे होऊ शकू असे जिव्हाळ्याचे परंतु निर्व्यसनी मित्र जोडणे याचा छान उपयोग होतो. 

 सकारात्मक दृष्टिकोन व विचार : परिस्थिती कधीच एकसारखी रहात नाही. ती बदलेलच यावर विश्वास ठेवायला हवा. माझ्यात सकारात्मक बदल घडतीलच हा विश्‍वास ठेवायला हवा. सकारात्मक स्वयंसूचनेची तंत्रे, स्वत:ला स्वस्थ करून स्वयं सूचना देणे हे सगळे शिकून घ्यायला हवे. 

 Creative visualization तंत्रे व गायडेड इमेजरी : मानवाला बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती या खूप महत्त्वाच्या देणग्या मिळालेल्या आहेत. पाचही ज्ञानेंद्रिये वापरून बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्तीच्या साहाय्याने creative visualization व गायडेड इमेजरीच्या साहाय्याने सकारात्मक व आनंदमय अनुभव आपण घेऊ शकतो. हे सुरवातीला तज्ज्ञांच्या साहाय्याने स्क्रिप्ट निर्माण करून करावे लागते. ताणतणावाच्या निराकरणासाठी या तंत्रांचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. 

 चौरस व पौष्टिक आहार : ड्युटीच्या अनियमितवेळा लक्षात घेऊन सुद्धा जीवनसत्त्वयुक्त, प्रथिनेयुक्त, आहार, दूध व दुग्धजन्य पदार्थ, कमी तेलकट मांसाहार, भरपूर पाणी पिणे आवश्‍यक आहे. 

 आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन : मन:स्वास्थ्य कुठल्याही परिस्थितीत टिकवता येईल का? याचं उत्तर निश्‍चित होकारार्थी आहे. त्यासाठी मुळात आपण आतून स्वस्थ व्हायला हवे. शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करायला हवे. कुठल्या गोष्टी आपल्या आवाक्‍यात आहेत. आणि कुठल्या नाहीत हे शांतपणे समजून घ्यायला हवे. 

श्वासावर आधारित स्वस्थता 
आपला श्वास ही एक गोष्ट वर्तमान क्षणात असते आणि मन:शांती वर्तमान क्षणात राहण्याच्या सवयीतून मिळू शकते. श्वासावर लक्ष ठेऊन आपण शांत राहण्याचा सराव करू शकतो. आपण ‘आतून’ स्वस्थ होत असतानाच कंपनी/संस्थेतील सहकाऱ्यांचे एकमेकांशी असलेले संबंध चांगले (cordial ) राहण्यासाठी पुढील मुद्दे महत्त्वाचे आहेत. 

 एकमेकांशी संवाद साधताना ‘अहंकार’ आड येऊ नये याची काळजी  दिवसातला जास्तीत जास्त वेळ आपण इथे व्यतीत करतो आहोत, त्यामुळे सर्व एका कुटुंबातले सदस्य आहेत ही भावना.  आपण चुकू शकतो तसेच आपल्या सहकाऱ्यांकडूनही चूक होऊ शकते याची जाणीव.  दुसऱ्याला मदत करण्याची तयारी, सहकाऱ्यांवर दोषारोप व गॉसिपिंग टाळणे.  प्रामाणिकपणा  सहकाऱ्यांशी तुलना करणे टाळणे, मत्सर करणे निश्‍चित घातक आहे. 

 कमीटमेंटस पाळणे  अचीवमेंनट्‌सचे श्रेय वाटून घेणे.  कामाच्या ठिकाणी आल्याबरोबर वैयक्तिक व घरगुती ताण बाजूला ठेवणे.  त्यासाठी compartmentalization ची तंत्रे शिकून घेणे, सकारात्मक मानसिकता ठेवणे, उत्साही आनंदी वातावरण राखण्याचा प्रयत्न करणे. 

व्यवस्थापनाची भूमिका व सौहार्द 
कंपनीतील/संस्थेतील सकारात्मक, तणावरहित वातावरणासाठी व्यक्तीच्या मानसिक व भावनिक गरजा लक्षात घ्यायला हव्यात. त्या अशा - 

 Being Accepted : स्वीकारले जाते आहे 
 Being Believed in : माझ्यावर विश्वास ठेवला जातोय. 
 Being Cared about : काळजी घेतली जातेय 
 Being Forgiven : माझ्या हातून नकळत घडलेल्या चुकांबद्दल मला माफ केले जाते आहे (अति सौम्य व नियमात बसतील अशा) 
 Being Loved : स्नेह मिळतोय 
 Being Safe : इथे सुरक्षीत आहे 
 Being Supported : योग्य तेंव्हा पाठिबा मिळतोय 
 Being Trusted : माझ्यावर विश्वास ठेवला जातोय 
 Being Understood : समजून घेतले जाते आहे 
Being Valued : इथे किंमत दिली जातीय. माझ्या योगदानाची जाणीव ठेवली जाते आहे. 

वरील गरजा लक्षात घेऊन व्यवस्थापनाने धोरण ठरवले पाहिजे.  
व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संवाद पद्धती, त्यांचे ‘इगो’ कंपनीतील वातावरणावर अनिष्ट परिणाम करीत नाहीत ना याची जाणीव ठेवायला हवी. खरे तर हे सर्वच स्तरातील व्यक्तींना लागू आहे. प्रत्यक्ष कामाच्या जागेवर स्वस्थता व कार्यक्षमतेत वाढ करणारी तंत्रे - 
कामाच्या ठिकाणी येणाऱ्या तणावावर मात करण्यासाठी, जागेवरच करण्याची काही स्वस्थतेची तंत्रे आहेत. Visualization Techniques आहेत. त्यानं मन शांत होतंच शिवाय एकाग्रता, focusing, निर्णय क्षमता वाढते होते. आतून उत्साह वाटू लागतो. ही तंत्रे तज्ज्ञांकडून शिकून घ्यावीत. सुप्रसिद्ध व्यवस्थापकीय सल्लागार Betty Bender ने म्हटल्या प्रमाणे ‘When people go to work, they shouldn't have to leave their hearts at home.’ 

थोडक्‍यात, आयुष्यातला जास्तीत जास्त काळ आपण कामाच्या ठिकाणी व्यतीत करतो. आपल्यासाठी ते एक कुटुंबच आहे. तिथलं वातावरण छान असणं आणि त्या वातावरणातले आपण छान असणे, महत्त्वाचे! 

संबंधित बातम्या