गायडेड इमेजरी टेक्‍निक 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजनतज्ज्ञ
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

हितगूज 
 

अशोक वैद्यांची एक वर्षापूर्वी coronory angioplasty झाली. stent टाकली गेली. त्यांना पूर्वीपासून मधुमेह होता, त्यामुळे आता बरीच बंधनं आली. नियमित औषधोपचारांबरोबरच व्यायाम चालू झाला. पथ्य सुरू झालं. मधुमेह आणि हृदयरोग या दोन्ही आजारातून स्वस्थ होण्यासाठी मन शांत असणं खूप महत्त्वाचं आहे. मनाच्या शांत अवस्थेत कल्पनाशक्तीचा उपयोग करून शारीरिक स्वस्थता मिळवून देणारी काही तंत्रं आहेत, त्यांचाही उपयोग अशोक वैद्यांसाठी झाला. या तंत्राबरोबरच ध्यान आणि योगासनं यांची जोड दिली गेली. आज वैद्य पूर्णपणे स्वस्थतेच्या मार्गावर आहेत. गेल्या काही वर्षांत, एक महत्त्वाची संकल्पना मान्यता पावू लागली आली आहे, ती म्हणजे सायकोन्युरोइम्युनॉलोजी (PNI). शरीर व मन एकमेकांवर कसे परिणाम करतात याचा तो अभ्यास आहे. या संकल्पनेवर आधारित एक परिणामकारक तंत्र म्हणजे गायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशन होय. 

ही तंत्रं डॉक्‍टरांनी दिलेल्या औषधाला पर्याय नाहीत. म्हणजेच डॉक्‍टरांच्या औषधाच्या जोडीला उपकारक (Complimentary) म्हणूनच उपयुक्त ठरतात ही गोष्ट महत्त्वाची आहे. 

गायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशन, हे कल्पनाशक्तीचा शरीरस्वास्थ्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या वापर करण्याचं तंत्र आहे. हे तंत्र इतर वैद्यकीय उपचारांना पूरक आहे. मन आणि शरीर यांचा परस्परसंबंध वैद्यकशास्त्रानं मान्य केला आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण शरीर, भावना आणि सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मानसोपचाराद्वारे शारीरिक आजारांवर उपचार केला जातो. हृदयरोग व मधुमेह बरा करण्यासाठी औषधं, व्यायाम व पथ्यं या बरोबरच मनःस्वास्थ्यासाठीची वेगवेगळी तंत्रं तसेच गायडेड इमेजरी यांचा मानसिक व शारीरिक दोन्ही दृष्टीनं चांगला उपयोग होऊ शकतो. ताणतणाव, क्रोध, दुःख, अपराधगंड, भीती आणि इतर नकारात्मक भावना हृदयरोग तसेच मधुमेहासाठी अतिशय घातक आहेत. संशोधनाअंती सिद्ध झालंय, की गायडेड इमेजरी तसंच इतर स्वास्थ्य तंत्राद्वारे निर्माण होणारी स्वस्थ अवस्था या भावनांचा निचरा करते. रक्तदाब व नाडीची गती, तसंच रक्तातील शर्करा नियंत्रणात आणायला मदत करते. (संदर्भ - Hermann, Crowther, Pender,Sharpley इत्यादी). हृदयरोग संशोधनामधील मैलाचा दगड मानल्या गेलेल्या डॉ. डिन ओर्निश यांनी सिद्ध केलं होतं, की आहार, व्यायाम तसंच स्वस्थतेची तंत्रं यांनी CHD (कॉरीनारी हार्ट डिसीज) वर मात करता येते. याच स्वस्थतेच्या तंत्रांमध्ये गायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशन फार मोलाचं योगदान देऊ शकतं. अशा पद्धतीची स्वस्थतेची तंत्रं अनेक प्रगत देशातील रुग्णालयांत वापरली जातात. त्यामुळं रुग्णालयात कमी काळ राहावं लागणं, वेदना कमी होणं व काही केसेसमध्ये औषधांचा परिणाम लवकर होणं, ती कमी लागणं हेही घडलं आहे. 

मन व शरीराचं एकमेकांशी असलेलं नातं व मनाचा शरीरावर होणारा परिणाम या तत्त्वावर गायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशन हे तंत्र आधारित आहे. 

गायडेड इमेजरी ही एक प्रणाली आहे, ज्यामध्ये तुम्ही कल्पनेचा वापर करून स्वस्थता व शांततेच्या निवांत प्रदेशात जाता. निसर्गातील प्रतिमा व दृश्‍यांचा परिणामकारक उपयोग केला जातो. त्यासाठी तज्ज्ञ therapist ची गरज असते. निवांत व तरल अवस्थेत गेल्यावर तुम्ही तज्ज्ञांच्या सूचनेप्रमाणं संपूर्ण लक्ष शरीरातील आजारी अवयवावर किंवा विशिष्ट सिस्टिमवर केंद्रित करता. उदा. हृदयरोगात, कॉरीनारी हार्ट डिसीज (CHD) मध्ये रोहिणी काठिण्य म्हणजेच हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये (आर्टरिज) plaque जमा होतो. रक्तवाहिन्या अरुंद  होतात. या अवस्थेतील व्यक्तीला हृदयाची आजारी स्थिती डोळ्यासमोर आणायला सांगितली जाते. त्या स्थितीवर फोकस करून arteries plaque किंवा मेद विरघळत आहे. रक्तवाहिन्या रुंद होत आहेत. हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत आहे व प्राणवायू मिळत आहे हे चित्र तीव्रपणे उभे केले जाते. हा अनुभव सुखद भासण्यासाठी एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारे सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारे प्रतिमांद्वारे स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेलं जातं व सेशन समाप्त होतं. 

डायबेटिससाठी आपला कोमट श्‍वास डोळ्यातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतो आहे. तिथं विरघळतो आहे. तेथील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या उघडल्या जाताहेत. त्यांच्यात आवश्‍यक ते बदल, दुरुस्ती होते आहे. त्या सक्षम होताहेत. काही काळ तिथं थांबून हा श्‍वास मेंदूच्या अफलातून अशा network ध्ये शिरतो आहे. तेथील नाजूक आणि एलिगंट असे मज्जातंतू व अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांचे patterns उघडले जाताहेत, स्वस्थ होताहेत. निर्माण झालेले व होऊ शकणारे अवरोध, अडथळे दूर होताहेत. माझ्या प्रत्येक श्‍वासागणिक विलक्षण तेजस्वी, शीतल आणि सुखद असा प्रकाश जादू करतो आहे. शरीरातील सर्व सिस्टिम्स स्वस्थ होत जाताहेत. हाच प्रकाश पॅंक्रियाजमध्ये प्रवेश करतो आहे. तिथं अस्तित्वात असलेल्या पेशींच्या समूहाला उत्तेजित करतो आहे, ज्या योगे त्या शरीराला आवश्‍यक तेवढं व शरीर वापरू शकेल एवढंच इन्शुलिन तयार होतं आहे. ते शरीरातील पेशींपर्यंत व्यवस्थित पोचतं आहे. हे इन्शुलिन एखाद्या किल्लीप्रमाणं काम करत आहे. ज्यायोगे जणूकाही अन्नासाठी भुकेल्या पेशींचे दरवाजे उघडत आहेत आणि पेशींना व्यवस्थित पोषण मिळत आहे... हा अनुभव सुखद भासण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारा सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारे, प्रतिमांद्वारे स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेलं जातं व सेशन समाप्त होतं. वारंवार व प्रभावीपणं उभ्या केलेल्या कल्पनाचित्रांचा, अंतर्मनाच्या शक्तीचा हा विलक्षण आविष्कार असतो.

गायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशन दरम्यान मेंदूतील भावना नियंत्रण केंद्रांकडं सकारात्मक सूचना पाठवल्या जातात. ज्या पुढं autonomic nervous system व इम्यून सिस्टीमकडं जातात.. ज्याचा चांगला परिणाम हार्ट रेट, रक्तदाब, रक्तशर्करा  यावर होतो. चांगली संप्रेरकं स्रवली जातात. आजार लवकर बरा होण्याच्या दृष्टीनं, शरीर अनुकूल व तत्काळ प्रतिसाद देऊ लागतं. सेशननंतर व्यक्तीला अतिशय शांत, उत्साही व टवटवीत वाटतं. याप्रमाणं प्रकृतीनुसार अनेक सेशन केली जातात. त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. रक्तशर्करा व लिपीड प्रोफाईलवर अनुकूल परिणाम होतो. आत्मविश्‍वास वाढतो, ताण नाहीसा होतो. 

वर वर्णिलेली उदाहरणं फक्त कल्पना येण्यासाठी दिली आहेत. प्रत्यक्षात आजारी व्यक्तीची भावनिक जडणघडण, एकूण मानसिक स्थिती वगैरे लक्षात घेऊन तज्ज्ञ स्क्रिप्ट तयार करतात. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं स्क्रिप्ट असू शकतं व सेशन्सची संख्या वेगळी वेगळी असू शकते. होऊन गेलेला आजार पुन्हा उद्‌भवू नये यासाठीही या तंत्राचा उपयोग होतो.  

डॉक्‍टरांनी दिलेल्या औषधं, व्यायाम, पथ्यं यांच्या जोडीला या तंत्राचा तज्ज्ञांच्या सहाय्यानं अतिशय परिणामकारक असा उपयोग होऊ शकतो.

 

गायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशन तंत्राचा उपयोग खालील आजारातही होऊ शकतो... 

  • कर्करोग - केमोथेरपी सुसह्य करण्यासाठी. 
  • वेगवेगळे ट्यूमर्स 
  • गरोदरपणात 
  • शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियेनंतर तब्येतीत सुधारणा होण्यासाठी 
  • शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी 
  • नैराश्‍य व मानसिक अस्वस्थतेचे आजार 
  • निद्रानाश व झोपेचे विकार 
  • वजन कमी करणं 
  • मायग्रेन 
  • होऊन गेलेले विकार पुन्हा होण्यापासून प्रतिबंध होणं इत्यादी.

संबंधित बातम्या