रंग खुलवणारी मेंदी!

सुप्रिया खासनीस
सोमवार, 29 जुलै 2019

कव्हर स्टोरी : मेंदी विशेष
 

श्रावणाचा धुवाधार पाऊस, हिरवागार शालू नेसलेली धरणीमाता व सारी सृष्टी, त्यातच श्रावणात येणाऱ्या व्रतवैकल्याची चाहूल हे पाहून स्त्रियांना मेंदीची आठवण ही येणारच. मेंदी हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येक सणासाठी हातावर मेंदी काढण्याची हौस ही प्रत्येक स्त्रीला असते. भारतात सर्वत्र प्रचलित असलेल्या प्राचीन धार्मिक परंपरेचे पालन म्हणून मंगलप्रसंगी स्त्रियांच्या हातापायावर मेंदी काढली जाते.

मेंदीचा हिरवा व लाल रंग 
निसर्गामध्ये हिरवा रंग सर्वत्र असून झाडे, वेली, फुले, पाने, शेती इत्यादींच्या हिरव्या रंगामुळे वनसृष्टी शोभून दिसते व ते पाहून मनाला शांतता मिळते. हिरव्या रंगाच्या वस्त्रामुळे देवी लक्ष्मीही सुशोभित दिसते. तसेच लाल रंगालाही उच्च स्थान आहे. शुभकार्य, मंगलकार्य यासाठीही लाल वस्त्र व रंगाचा वापर अधिक केला जातो. देव-देवतांनाही लाल रंग, गंध, चंदन लावतात. प्राचीन काळापासून शृंगारामध्ये लाल व हिरव्या रंगाला प्राधान्य दिले आहे. लाल व हिरव्या रंगामुळे स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. हिरव्या व लाल रंगामुळे माता भगवतीची सात्विकता, सौभाग्याचे प्रतीक म्हणून प्रतीत होते. म्हणून मेंदीने हातपाय रंगविणे हा स्त्रियांचा शृंगाराचा भाग मानला जातो. 

रामायण काळी श्रीराम, लक्ष्मण यांच्या विवाहावेळी पुष्परंगाच्या साहाय्याने हातापायांवर पाना-फुलांचे आकार काढले होते. या रंगामध्ये विविध औषधी रस मिसळले होते. या सुगंधी मिश्रणाने हातापायांवर विविध आकार साकारले होते. सुगंधी मिश्रणाला पत्रावली असे म्हटले आहे. अजंठा-वेरूळ येथील लेण्यांमध्ये हातापायांवर मेंदी रेखाटलेली शिल्पे आहेत. अयोध्या, वृंदावन इत्यादी ठिकाणी काही मंदिरांमध्ये त्यांच्या मूर्तींचा शृंगार नैसर्गिक रंग आणि सुगंधी द्रव्ये यांनी तयार केलेल्या पत्रावलीने केला जातो.

मेंदीचा जसा शृंगारामध्ये वापर केला जातो, तसाच तिचा आरोग्यासाठीही वापर केला जातो. मेंदीच्या पानांमध्ये-बियांमध्ये औषधी गुण असतात. त्यांचा उपयोग आयुर्वेदामध्ये रोग निवारणासाठी सांगितलेला आहे. केसांच्या निगराणीच्या दृष्टीनेही मेंदी उपयुक्त आहे. त्यामुळे डायसाठी हर्बल मेंदीचा वापर केला जातो. विशिष्ट प्रकारची मेंदी लावल्याने केसांचा पोत सुधारतो. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात तळपायाला मेंदी लावतात.

सण आणि उत्सवात भारतीय संस्कृतीने मेंदीसारख्या वनस्पतीलाही जवळ केले आहे. मेंदी थंड असून शरीरातील उष्णता शोषून घेते. त्वचा विकारावरही मेंदी गुणकारी आहे. मेंदी थंड असल्यामुळे ती लावली असता हातापायांची उष्णता कमी होते. उन्हाळ्यात हातपाय आणि मस्तक यावर मेंदीचा लेप लावणे लाभदायक ठरते. ग्रीष्म ऋतूमध्ये उकाडा असल्याने उष्णता वाढते व ती मेंदी लावल्याने कमी होते म्हणून नागपंचमीला स्त्रिया-मुलींनी हातापायावर मेंदी लावण्याची प्रथा पडल्याचे दिसते.

महाराष्ट्रासह इतर राज्ये म्हणजे राजस्थान, उत्तरप्रदेशमध्ये राखी, होळी, ईद, नागपंचमी, करवाचोथ अशा महत्त्वपूर्ण सणांसाठी मेंदी काढणे शुभ मानले जाते. राजस्थानी स्त्रियांचा मेंदी काढण्याचा कार्यक्रम खूप छान असतो. लग्नप्रसंगी लग्नाच्या आधी १-२ दिवस मेंदी लावण्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. नववधूला मेंदी लावताना ठेक्‍याच्या तालावर नाचगाणी होत असतात. मेंदी हा सौंदर्यालंकार मानला जातो.

पूर्वी स्त्रिया ठराविक सणांसाठीच मेंदी काढत असत. त्यांच्यामागे शेती, गृहिणीचे कामकाज असे. त्यामुळे प्रत्येक सणाला त्यांना मेंदी काढणे शक्‍य नसे. त्यावेळी मेंदीच्या झाडांची ओली पाने पाटा-वरवंट्यावर अगदी बारीक वाटून त्या मेंदीने हातापायावर लहान मोठे ठिपके व रेषा काढत असत. मेंदी वाटताना हात पूर्ण रंगून जात असत. पण त्या वाटलेल्या पानांच्या मेंदीची रंगत काही न्यारीच असायची. नंतर काही काळांनी मेंदीच्या झाडाची पाने वाळवून खलबत्त्यात कुटून त्याची पूड केली जाऊ लागली. ही पूड पाण्यात भिजवून त्याची मेंदी तयार केली जात असे व काडीच्या साहाय्याने ती हातावर रेखाटत असत.

मध्यंतरीच्या काळात वाटलेल्या मेंदीची जागा पूडरुपी मेंदीने घेतली. बाजारात मिळणारी तयार मेंदीची पूड वापरली जाऊ लागली. ही मेंदी चांगली रंगण्यासाठी व टिकण्यासाठी त्यावर बरेच सोपस्कार केले जात. मेंदी भिजवताना तिच्यामध्ये निलगिरीचे तेल, लिंबाचा रस, चुना यापैकी काही घातले जात असे. चिकट तार येण्यासाठी त्यात भेंडीचा रस घातला जात असे. ती चांगली भिजल्यावर काडेपेटीच्या काडीने किंवा उदबत्तीच्या काडीने हातावर रेखाटली जात. ही मेंदी काढताना महिलांचे हस्तकौशल्य पणाला लागत असे. त्यासाठी चुरशीची चढाओढ लागत असे. पण त्यातही महिलांना आनंद मिळत असे.

नैसर्गिक मेंदीचा वापर करणे सर्वाधिक योग्य असले, तरी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचा अभाव आणि मेंदीच्या पानांची सहज उपलब्धता नसणे यामुळे तयार मिळणारी मेंदी वापरणे अपरिहार्य झाले आहे. कालांतराने हाताने काढण्याच्या मेंदीच्या जागी तयार प्लॅस्टिकचे आवरण असलेले कोन आले. स्त्रियांना कामावरून घरी आल्यावर घरचे सांभाळून, मेंदी आणून ती भिजवणे, काही वेळाने ती लावणे यामध्ये बराचसा वेळेचा अपव्यय होऊ लागला. तयार मेंदीच्या कोनामुळे स्त्री नोकरदार वर्गाची वेळेची बचत होऊ लागली. त्यामुळे सणावारी, मंगलप्रसंगी आता मेंदी काढण्याची प्रथा जास्त रूढ झाली. बाजारात सध्या अरेबिक कोन, तयार रेखाटने मिळू लागली आहेत. निरनिराळ्या संस्थांमार्फत चहा पावडरची मेंदी तयार करणे, मेंदी तयार करण्याच्या पद्धती इत्यादीबाबत कार्यशाळा आयोजित केल्या जातात. सार्वजनिक उत्सव म्हणजे गणेशोत्सव, नवरात्र यामध्येही ९-१० दिवसांच्या कालावधीत महिला आपल्या हातावर तयार नक्षीचे ठसे असलेली मेंदी काढून घेतात व आपली हौस पूर्ण करतात. मेंदीबाबत कार्यशाळा, क्‍लासेस इत्यादींमुळे तिची पारंपरिकता टिकली जाऊन ती कला विकसित होऊ लागली आहे. या कलेला विकसित करणे हे सध्याच्या दृष्टीने तिशय महत्त्वाचे आहे. मेंदी व्यवसायामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होण्याची संधी मिळालेली आहे. हल्लीच्या तंत्रज्ञानामुळे निश्‍चितच या कलेला ऊर्जितावस्था प्राप्त होईल.

मेंदी कलाकृती प्रकार
जरदोसी मेंदी 
या प्रकारात वस्त्रे आणि दागिने यांना शोभून दिसणाऱ्या कलाकृती काढल्या जातात. कलाकृती आकर्षक दिसण्यासाठी वर्ख, विविधरंगी चमकी, खडे (कुंदन) यांनी सजविण्यात येतात. काही वेळेला प्रथम हातावर नेहमीच्या मेंदीने कलाकृती काढतात आणि ती रंगल्यावर त्या आकृत्या सोनेरी किंवा चंदेरी रंगांनी रंगवितात. जरदोसी मेंदीचा आणखी एक प्रकार म्हणजे हातावर नेलपेंटने कलाकृती काढून तिच्यावर विविध रंगांची पखरण केली जाते.

ग्लिटर मेंदी 
यासाठी ग्लिटर पेन व ग्लिटर ट्यूबचा वापर केला जातो. यामध्ये वेगवेगळे चकाकणारे रंग भरलेले असतात. त्याच्या साहाय्याने हातावर थेट कलाकृती काढण्यात येते. नेहमीच्या मेंदी लावण्याच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी जो वेळ लागतो तो टाळण्यासाठी हा मार्ग अवलंबिला जातो. काही कार्यक्रमानंतर ही कलाकृती पाण्याने सहज धुवून टाकता येते.

छटांची मेंदी (शेडिंग) 
यामध्ये कलाकृतीतील विविध आकृत्यांची बाह्य रेषा काळ्या रंगाच्या रसायनाने काढली जाते आणि आकृत्यांचा आतील भाग नेहमीच्या मेंदीने विविध आकार काढून भरण्यात येतो. मेंदी रंगल्यावर काळ्या आणि लाल रंगाच्या या मेंदीवर संबंधित स्त्रीने परिधान केलेल्या वेषभूषेवरील कलाकृती आणि रंगसंगती यांना अनुसरून खडे आणि कुंदन लावण्यात येतात.

नखांना मेंदी 
हातपाय आकर्षक दिसण्यासाठी नखांना मेंदी लावली जाते.

स्टिकर टॅटू 
सध्याच्या काळात हातावर मेंदी काढण्यापेक्षा मेंदीची कलाकृती असलेले स्टीकर टॅटू वापरले जातात. हे एका रंगातील किंवा विविध रंगी असतात. आता तर मेंदीने लग्न, मुंज, धार्मिक सण, पूजा इत्यादी कार्यक्रमासाठी स्त्रियांप्रमाणे पुरुषांमध्येही वर्चस्व सिद्ध केले आहे. मेंदी स्त्रीच्या सौंदर्याला चार 
चाँद लावते. नववधूच्या शृंगारासाठी हल्ली व्यावसायिकांमार्फत हातापायांवर मेंदी रेखाटली जाते. त्या रेखाटनांमध्ये विविधता दिसून येते. उदा. हातावरील सनई-चौघडे, डोलीतील वरात, त्यामधील वधू-वरांची नावे किंवा एखादा भावी संदेशही रेखाटला जातो. नववधूची हातावरील मेंदी जितकी जास्त रंगते, खुलते तितके तिच्या पतीचे तिच्यावर प्रेम असते असे म्हटले जाते आणि म्हणूनच मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं!  

संबंधित बातम्या