ग्रहमान : २८ एप्रिल ते ४ मे २०१९

अनिता केळकर
सोमवार, 29 एप्रिल 2019

ग्रहमान

मेष - ग्रहांची मर्जी आहेच. तेव्हा प्रगतिपथावर राहाल. व्यवसायात तुमच्या बेधडक निर्णयाचा उपयोग होईल. नवीन कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी विशेष लक्ष राहील. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. कामानिमित्त प्रवासयोग घडतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात कौटुंबिक जीवनातील सुखद प्रसंग साजरे कराल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. सामूहिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. 

वृषभ - संयम व विचार यांचा योग्य समन्वय साधून कामात निर्णय घ्याल. व्यवसायात स्वतःची कुवत ओळखून धाडस करावे. पैशाच्या व्यवहारात दक्ष राहावे. नोकरीत कार्यतत्पर राहावे. गैरसमजुतीने होणारे घोटाळे टाळावेत. महत्त्वाच्या कामांना विशेष प्राधान्य द्याल. घरात कर्तव्यपूर्तीला प्राधान्य राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल्याने मानसिक समाधान मिळेल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल. 

मिथुन - तुमचा उत्साह व आनंद द्विगुणित करणारी घटना घडेल. व्यवसायात प्रगतीचा आलेख चढता राहील. पैशाची आवकही चांगली असेल. मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान आहे. नोकरीत तुमच्या शब्दाला मान मिळेल. अंगी असलेले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. प्रकृतीमान सुधारेल. 

कर्क - भोवतालच्या परिस्थितीचा व माणसांचा अचूक अंदाज येईल. त्यामुळे थोडे निराशही व्हाल. परंतु, मनोबल उत्तम राखले, तर येणाऱ्या अडचणींवर मात करून यश संपादन कराल. व्यवसायात तुमच्या सहनशीलतेची कसोटी असेल. पैशाची चणचण राहील. नवीन कामे डोळ्यासमोर असतील. त्यामुळे नुसतीच धावपळ, दगदग होईल. नोकरीत जिभेवर साखर पेरून सहकाऱ्यांशी वागावे लागेल व गोड बोलून कामे करून घ्यावी लागतील. स्वतःच्या तत्त्वांना मुरड घातली, तर फायदा तुमचाच होईल. घरात वैचारिक मतभेद होतील, तरी डोके शांत ठेवावे. तब्येतीची काळजी घ्यावी. 

सिंह - अशक्‍यप्राय गोष्ट शक्‍य करून दाखवून सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. व्यवसायात विरोधकांचा विरोध मावळेल व तुमच्या कामांना तत्त्वतः मान्यता मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत, कामात यशाचा झेंडा रोवाल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. जोडव्यवसायातून जादा कमाई करता येईल. घरात प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. पूर्वी ठरवलेले समारंभ पार पडतील. तुमची मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. 

कन्या - ग्रहांची साथ मिळाल्याने आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करून उलाढाल वाढवण्याचे बेत सफल होतील. जुनी कामे चालू ठेवून नवीन कामेही हाती घ्याल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत बदल कराल. नोकरीत नवीन प्रशिक्षणासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. कामांची नवीन जबाबदारीही पेलावी लागेल. परदेश व्यवहार व परदेशगमनाची संधी येईल. घरात सहजीवनाचा आनंद मिळेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांना अपेक्षित जीवनसाथी मिळेल. 

तूळ - आनंद देणारी बातमी कळेल. तुमचा उत्साही स्वभाव व वातावरणाची साथ मिळाल्याने कामातील प्रगतीला वेग येईल. सकारात्मक दृष्टिकोन राहील. व्यवसायात अंथरूण पाहून पाय पसरावेत. पैशाचा ताळेबंद मांडून त्याप्रमाणे कृती करावी. नोकरीत कामात सहकारी व वरिष्ठांची मदत मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. नवीन वाहन, जागा घेण्याचे तुमचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल. घरात कुटुंबासह छोटी सहल काढाल. कुटुंबातील लोकांच्या सुख-समाधानासाठी वेळ व पैसेही खर्च कराल. 

वृश्‍चिक - स्वभावाविरुद्ध वागून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का द्याल. आशावादी दृष्टिकोन राहील. व्यवसायात नवीन योजना प्रोत्साहित करतील. कामात नवीन तंत्रज्ञान वापरून फायद्याचे प्रमाण वाढवाल. कामात हितचिंतकांची मदत मिळेल. धोके पत्करून उडी घेण्याचे धाडस कराल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांची मदत मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. घरात मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. तरुणांचे विवाह ठरतील. नवीन खरेदीने आनंद मिळेल. मानसिक समाधान लाभेल. 

धनू - परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे कार्यप्रणालीत बदल करावा, यश हमखास मिळेल. व्यवसायात तुमच्या स्वातंत्र्य प्रिय स्वभावामुळे बेधडक निर्णय घेऊ शकाल. कामात एक नवा दृष्टिकोन मिळेल. पैशांची चिंता मिटेल. रेंगाळलेली कामेही मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. कामात जादा सवलती व अधिकारही मिळतील. मात्र, त्यांचा गैरवापर करू नये. घरात कौटुंबिक सुखसोहळ्यात सहभागी व्हाल. आनंद मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. तरुणांचे विवाह ठरतील. सामूहिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. 

मकर - धाडस करून नवीन पावले टाकाल व यशही मिळेल. आशावादी दृष्टिकोन तुमच्या जीवनाला कलाटणी देईल. व्यवसायात रेंगाळलेली कामे पूर्ण करून नवीन कामांकडे लक्ष द्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. पैशाचा विनियोग भविष्याची तरतूद करण्यासाठी योग्य प्रकारे कराल. नोकरीत कामात बिनचूक राहून वेळेत कामे पूर्ण करावीत. वरिष्ठांशी योग्य ते संबंध राखून त्यांना वेळोवेळी कामातील प्रगती कळवावी. जोडव्यवसायातून लाभाची शक्‍यता आहे. घरात खर्चांवर बंधन ठेवण्याचा प्रयत्न यश देईल. मुलांसाठी थोडा वेळ मात्र द्यावा लागेल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. 

कुंभ - तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान आहे. व्यवसायात प्रयत्न व नशिबाची साथ मिळेल. कामात प्रगती होईल. खेळत्या भांडवलाची तरतूदही होईल. नोकरीत तुमच्या कामाला मागणी राहील. मात्र, कामात व कामासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नात कोणतीही कसूर करू नये. घरात नवीन खरेदीचे बेत सफल होतील. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. कुटुंबासमवेत छोटीसी सहल काढाल. तरुणांना वैवाहिक जीवनासाठी योग्य जोडीदार भेटेल. 

मीन - तुमचा उत्साह व आशावादी दृष्टिकोन वाढवण्यास पूरक ग्रहमान लाभेल. व्यवसायात महत्त्वाकांक्षा व जिद्द यांच्या जोरावर नवीन कामे हाती घ्याल. महत्त्वाची घटना मन आनंदी करेल. पैशाची ऊब राहील. नोकरीत प्रतिष्ठा मिळवून देणारे काम कराल. वरिष्ठ नवीन कामाची संधी देतील, लाभ घ्यावा. नवीन ओळखी होतील. मनोकामनाही पूर्ण होतील. घरात इच्छाआकांक्षा पल्लवीत करणारे वारे वाहतील. मित्रमैत्रिणीसोबत वेळ मजेत जाईल. मानसिक शांतता मिळेल. 

संबंधित बातम्या