ग्रहमान : २ ते ८ जून 

अनिता केळकर
बुधवार, 30 मे 2018

ग्रहमान
 

मेष : कामत यश मिळेल. व्यवसायात जादा आत्मविश्‍वास बाळगू नये. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामाचा आनंद मिळेल. नोकरदारांना वरिष्ठांच्या मर्जीत राहता येईल; त्यामुळे जादा सवलती मिळतील. महिलांना वैवाहिक सुख लाभेल. विद्यार्थ्यांना यशदायी ग्रहमान आहे. 

वृषभ : ओळखी व मध्यस्थीतून कामात प्रगती होईल. नवीन कामे मिळतील. व्यवसायात हातातील कामांना विलंब होण्याची शक्‍यता तरी नाराज होऊ नये. नोकरीत नवीन संधी चालून येतील. प्रवासयोग आहे. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना मुलांची शैक्षणिक प्रगती कळेल. स्वास्थ्याबाबत मात्र थोडे अधिक दक्ष राहावे लागेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. 

मिथुन : गुरू, रवीची उत्तम साथ मिळेल. एखादी चांगली बातमी कानावर येईल. व्यवसाय व भागिदारीतून विशेष लाभ होईल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. उत्तम बदल होतील. मानसन्मान मिळेल. महिलांना यशप्राप्तीने मानसिक समाधान मिळेल. नोकरदार महिलांनी वादविवाद वाढू देऊ नयेत. तरुणांना विवाहयोग येतील. 

कर्क : व्यवसायात अडथळे आले तरी कामाचा वेग कमी करू नये. खरेदी-विक्रीतून लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. अचानक धनप्राप्तीचे योग येतील. नवीन ओळखीतून फायदा होईल. महिलांना आनंदाची बातमी कळेल. मुलांची प्रगती व प्रकृतीबाबतीतील चिंता मिटेल. राहत्या घराचे प्रश्‍न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात पूरक ग्रहमान. 

सिंह : व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य ते बदल करावे. यशाची मदार तुमच्यावर राहील. नवीन कामे मिळतील. नोकरदार व्यक्तिंनी सहकाऱ्यांवर विसंबून न राहणेच चांगले. कामानिमित्ताने प्रवास घडेल. सामाजिक, धार्मिक कार्यात मात्र प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. महिलांनी कामात लवचिक धोरण ठेवले तर विशेष फायदा होईल. मित्रमंडळी ,आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. 

कन्या : पैशाच्या व्यवहारात चोखंदळ राहाल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हातील घ्याल. जुनी येणी वसूल होतील. देणी देता येतील, त्यामुळे तणाव कमी होईल. नोकरीत थोडी कळ सोसलीत तर परिस्थितीत बदल होईल. मनाप्रमाणे कामे होतील ही अपेक्षा ठेवू नये. महिलांनी रागांवर नियंत्रण ठेवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. कौटुंबिक उत्कर्ष होईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. 

तूळ : गुरू, शुक्र विशेष फलदायी ठरतील. व्यवसायात हरतऱ्हेने लाभ होतील. विचार व कृती यांचा समन्वय साधून रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. नोकरीत अतिस्पष्टवक्तेपणा टाळावा. वादाच्या प्रसंगापासून चार हात लांब राहावे. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. महिलांनी ऐकीव गोष्टींवर विश्‍वास ठेवू नये. करमणुकीत वेळ मजेत जाईल. घरगुती समारंभ ठरतील. विद्यार्थ्यांना मनःशांती उत्तम मिळेल. 

वृश्‍चिक : व्यवसायात हितशत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवाल. त्याप्रमाणे कामात बदल करून पुढचे बेत आखाल. पूर्वी केलेल्या कामातून आता विशेष लाभ होईल. नोकरीत उत्तम बदल घडून येईल. धनलाभाची शक्‍यता हातून सामाजिक व धार्मिक कार्ये पार पडतील. महिलांनी वाद व भांडणे सामंजस्याने सोडवावीत. विनाकारण झालेले गैरसमज दूर करावेत. छोट्याशा सहलीचे आयोजन कुटुंबासमवेत करावे. 

धनू : कामाचा वेग वाढेल. यशाची कमान उंचावेल. पैशाची स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील. नवीन कामे मिळकतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. नवीन वास्तूत राहायला जाण्याचे योग येतील. महिलांना घरगुती कामातून यश मिळेल. प्रियजनांच्या जीवनातील संस्मरणीय शुभघटना साजरे कराल. 

मकर : व्यवसायात उलाढाल वाढेल. महत्त्वाची कामे गती घेतील. आर्थिक लाभ होईल. हितचिंतकांची मदत होऊन नवीन कामे मिळतील. नोकरीत कामाचे बेत गुप्त ठेवावे. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना उत्तम यश मिळेल. भाग्योदय होईल. महिलांना मानमरातब मिळेल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. कौतुक होईल. विद्यार्थ्यांचे मन एकाग्र होईल. 

कुंभ : रवी, मंगळ, बुध सारखे महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. व्यवसायात आधुनिकीकरण करून विस्ताराचे बेत यशस्वी होतील. अपेक्षित पत्रव्यवहार व परदेशगमनाच्या कामांना चालना मिळेल. विरोधकांच्या कारवायांचा अचूक अंदाज येईल. नोकरीत बढती मिळेल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना मानसिक व शारीरिक आरोग्य जपावे लागेल. अतिसाहस करू नये. दगदग धावपळही कमी करावी. 

मीन : नशिबांवर विसंबून न राहता प्रयत्नांवर विश्‍वास ठेवावा. यशप्राप्ती होईल. व्यवसायात अशक्‍य वाटणाऱ्या कामात उत्तम प्रगती होईल. पैशाची स्थिती उत्तम राहील. नोकरीत कामात बिनचूक राहणे लाभदायक ठरेल. कुसंगत टाळावी. आजचे काम आजच पूर्ण करावे. महिलांनी सामोपचाराने वागून कामे मार्गी लावावीत. आवडत्या छंदातून व उपक्रमातून प्रसिद्धी मिळेल. संततीबाबत शुभ बातमी कळेल. तरुणांचे विवाह जमतील. 

संबंधित बातम्या