ग्रहमान : १४ ते २० एप्रिल २०१८

अनिता केळकर
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

ग्रहमान

मेष ः हाती घेतलेली कामे पूर्णत्वाला आल्याने हायसे वाटेल. व्यवसायात कामात सतर्क राहावे. अडथळ्यांवर मात करून कामे मार्गी लावाल. कामाची वाच्यता फार करू नये. पैशाच्या व्यवहारात चोख राहावे. नोकरीत चांगल्या संधीसाठी तुमची निवड होईल. कामात झालेली हयगय मात्र तुम्हाला सहन होणार नाही तरी सजग राहावे. चिकाटी सोडू नये. घरात कार्यपद्धतीत बदलामुळे व्यक्तीची विचारधारा बदलेल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. महिलांनी प्रकृतीची हेळसांड करू नये. तरुणांनी अतिसाहस टाळावे. 

वृषभ ः व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्ती जास्त फायदा घ्यावा. निराशा झटकून ठरवलेल्या पद्धतीने कामे पूर्ण कराल. शक्‍यतो कुणावरही अवलंबून राहू नये. नोकरीत शिस्तबद्ध राहून हातातील कामे पूर्ण कराल. सहकारी व वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना? याकडे लक्ष द्यावे. सहकाऱ्यांच्या गोड शब्दाला बळी पडू नये. घरात नवीन वस्तू खरेदीचा मोह होईल. मोठ्या व्यक्तींच्या सहवासाने आनंद मिळेल. महिलांना मानसिक समाधान मिळेल. तरुणांचे विवाह जमतील. 

मिथुन ः स्वयंसिद्ध राहून कामे करण्याचा विचार राहील. व्यवसायात मर्यादा ओळखून कामे पूर्ण कराल. हाती घेतलेली कामे बिनचूक पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळावे. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे केलीत तर लाभ होईल. महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. योग्य संधीची वाट बघावी. घरात मुलांच्या प्रगतीबाबत समाधानी राहाल. अपेक्षित कामे मार्गी लागतील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. 

कर्क ः या सप्ताहात सभोवतालच्या व्यक्तींची पारख होईल. कठीण प्रसंगी कोणीही मदतीला नसते याची जाणीव होईल. व्यवसायात कायद्याच्या चौकटीत राहून व्यवहार करावा. नियमांचे उल्लंघन होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. हातातील पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करावा. नोकरीत कामात चोख राहून सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. मात्र इतरांकडून मदतीची अपेक्षा करू नये. प्रतिष्ठित व्यक्तींपासून चार हात लांब राहाणे हितावह. कामाबाबत वाच्यता न करणे फायद्याचे राहील. घरात गैरसमजुतीने होणारे वाद टाळावे. सलोख्याचे धोरण ठेवून प्रश्‍न मार्गी लावा. महिलांनी अतिविचार करू नये. 

सिंह ः तडजोडीने कामे यशस्वी कराल. व्यवसायात ओळखीतून नवीन कामे मिळतील. बाजारातील चढ-उतारांचा व स्पर्धकांचा अंदाज घेऊन तुमची धोरणे आखाल. हाती घेतलेल्या कामात लक्ष केंद्रित करावे. उधारीपेक्षा रोखीच्या व्यवहारांवर भर द्यावा. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा अधिकार व सवलतीही देतील. मात्र गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी. नवीन हितसंबंध जोडले जातील. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. घरात औषधपाणी, दुरुस्ती इत्यादी गोष्टींवर खर्च होईल. जास्त दगदग, धावपळ करू नये. विद्यार्थ्यांनी एकाग्रता साधून अभ्यास करावा. 

कन्या ः प्रयत्न व नशीब यांची सांगड घालून कामे मार्गी लावाल. व्यवसायात तात्पुरती खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. सरकारी नियमांचे पालन करताना अडथळे येतील तरी सबुरीचे धोरण ठेवावे. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. सर्वांशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न राहील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचा अनवधानाने अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. कामानिमित्ताने प्रवासयोग संभवतो. पैशाचा अतिमोह टाळावा. घरात दोन पिढ्यांतील अंतर जाणवेल. तरुणांना प्रेमात रुसवे फुगवे सहन करावे लागतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. महिलांना मनाजोगता खर्च करता येईल. 

तूळ ः मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल. व्यवसायात कामातील अटी व शर्तींचा विचार करून मगच नवीन कामे हाती घ्यावे. हातातील कामे वेळेत बिनचूक पूर्ण करण्याकडे कल राहील. नोकरीत योग्यवेळी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. केलेल्या कामाचा आर्थिक स्वरूपात मोबदलाही मिळेल. बोलण्यावर मात्र विशेष संयम ठेवावा. घरातील गोष्टींचा कामावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. नवीन खरेदीचा मोह होईल. पैशाचे गणित कोलमडणार नाही याची दक्षता घ्यावी. 

वृश्‍चिक ः प्रगतीच्या रथावर स्वार झाला असल्याने यशाची धुंदी राहील. मात्र ती धुंदी डोक्‍यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. भविष्यात फायदा देणाऱ्या कामासाठी धोका पत्करण्याची तुमची तयारी असेल. मात्र, चुकीच्या संगतीने कोणतेही निर्णय घेऊ नये. नोकरीत सहकारी व वरिष्ठ मतलबापुरते तुमचा वापर करतील. कामासाठी जादा सवलती देतील. घरात क्षुल्लक कारणावरून गैरसमज होण्याची शक्‍यता आहे तरी डोके शांत ठेवावे. महिलांना आवडता छंद जोपासावा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. 

धनू ः येणाऱ्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा सकारात्मक विचार कराल. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी पैशाची तजवीज करावी लागेल. जुनी जागा विकून खेळते भांडवल उभारावे लागेल. फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण कराल. स्वयंसिद्ध राहून कामे केलेत तर लाभ होईल. नोकरीत बढाया न मारता कृतीवर भर द्यावा. कुवत ओळखून वरिष्ठांना आश्‍वासन द्यावे. विचारांची योग्य सांगड घालून कामे मार्गी लावाल. घरात तरुणांचे विवाह ठरतील. जुने प्रश्‍न पुन्हा डोके वर काढतील. तेव्हा विचारांती निर्णय घ्यावा. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी. 

मकर ः व्यवसायात आत्मविश्‍वास बळावेल. अति श्रम व अति विचार मात्र टाळावे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाचे योग्य नियोजन करावे आवश्‍यक वाटल्यास तडजोडीचे धोरण स्वीकारावे. नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागेल तरी फार वाच्यता नको. कामात चोख राहून कामे पूर्ण करावे. कामात विरंगुळा म्हणून छोटीशी सहल काढाल. घरात प्रियजन आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. प्रवास घडेल. मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल. मोठ्या व्यक्तींच्या वागण्याचा त्रास होईल. महिलांनी डोके शांत ठेवावे. 

कुंभ ः सहज सोप्या वाटणाऱ्या कामात विलंब झाल्याने चिडचिड होईल. व्यवसायात वेळेचे गणित मागेपुढे होईल. अपेक्षित मदत मिळेलच असे नाही. नवीन कामे स्वीकारताना त्यातील तांत्रिक अडचणींचा विचार करावा. सरकारी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. नोकरीत दुर्लक्ष झालेल्या कामांची वरिष्ठांना गरज भासेल. तातडीने कामे हाती घेऊन पूर्ण करावी लागतील. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे चिंता वाढेल. महिलांनी तब्येतीची कुरबूर चालू राहील. विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्‍वास बाळगू नये. 

मीन ः सभोवतालच्या व्यक्तींचे नवीन अनुभव येतील. व्यवसायात सावध वृत्तीने वागावे. फायद्यासाठी सलगी करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे. भावनेच्या भरात अयोग्य व्यक्तीशी संगत ठेवू नये. नोकरीत सहकाऱ्यांवर कामे सोपवाल तेव्हा वेळोवेळी लक्ष ठेवणे चांगले. पैशाची चिंता मिटेल. अनपेक्षित लाभ होतील. घरात सर्वांच्या हितासाठी चांगले निर्णय घ्याल. मात्र त्यामुळे भविष्यात तुम्ही अडचणीत येणार नाही ना? याची दक्षता घ्यावी. मित्रमंडळी नातेवाईक यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. मनोबल उंचावेल. तरुणांचे विवाह ठरतील. 
 

संबंधित बातम्या