ग्रहमान : ६ ते १२ जानेवारी २०१८

अनिता केळकर
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

ग्रहमान

मेष ः ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पहात होता व त्यात चांगली घटना घडल्याने तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात नव्या कल्पना मूर्त स्वरूपात आणाल. प्रतिष्ठित व्यक्तींची साथ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारल्याने हुरूप वाढेल. नोकरीत कंटाळवाणे काम संपेल. नवीन कामात लक्ष घालता येईल. प्रवासयोग संभवतो. महिलांना मानसिक शांतता लाभेल.

वृषभ ः मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात आधुनिकीकरणाचे बेत होतील. दगदग -धावपळ वाढेल. जमाखर्चाचे गणित मांडून त्याप्रमाणे कामाचे नियोजन करावे. नोकरीत वरिष्ठ कामानिमित्ताने सुविधा देतील. त्याचा वापर योग्य कारणासाठीच करावा. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात जबाबदाऱ्या वाढतील.

मिथुन ः ज्या संधीची तुम्ही वाट पहात होता, अशी संधी चालून येईल. त्याचा लाभ घ्यावा. व्यवसायात हातातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा चंग बांधाल. पैशाची बाजू भक्कम राहील. नवीन कामे ओळखीतून मिळतील. चालू नोकरीत विशिष्ट कामानिमित्त जादा अधिकार मिळतील. दीर्घकाळचे एखादे स्वप्न साकार होईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश लाभेल.

कर्क ः तुमच्या आशा पल्लवीत करणारे ग्रहमान आहे. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. तसेच आत्मविश्‍वासही बळावेल. व्यवसायात नवीन पद्धतीचे काम करण्याची तयारी असेल. त्यासाठी भांडवलही जमवू शकाल. सरकारी नियमांचे पालन करून कामातील अडथळे दूर करू शकाल. नोकरीत कामात नवीन आव्हानं स्विकारावेसे वाटेल. महिलांना समाधान मिळेल.

सिंह ः ‘‘थांबला तो संपला’’ या म्हणीची आठवण होईल व तुम्ही नव्या जोमाने कामाला लागाल. पण कोणत्याही गोष्टीत घाई करणे हे सध्या चुकीचे आहे, तरी सबुरीने वागावे. व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यासाठी जादा मेहनत घ्यावी लागेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी मुहूर्त लाभेल. नवीन ओळखी होतील.

कन्या ः नशिबाची साथ राहील. व्यवसायात प्रयत्नात सातत्यता ठेवणे गरजेचे होईल. कामात येणाऱ्या अडचणींवर निराश न होता जिद्दीने सामोरे जावे. यशाचे गमक ओळखून कामाचे नियोजन करावे. नोकरीत कामाच्या प्रमाणात यश मिळेल. वरिष्ठ तुमच्यावर नवीन कामाची धुरा सोपवतील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. महिलांना मनाजोगता खर्च करता येईल.

तूळ ः कामातील प्रगती तुमचा उत्साह वाढवेल. व्यवसायात सर्वांवर नियंत्रण ठेवण्यात यश येईल. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे मिळतील. मिळालेल्या पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करावा. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत कामात दिलासा मिळेल. सहकारी व वरिष्ठ मदत करतील. घरात ताण कमी झाल्याने सहजीवनाचा आनंद घ्यावा.

वृश्‍चिक ः ‘‘रात्र थोडी सोंगे फार’’ अशी तुमची अवस्था झाली असेल. व्यवसायात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. अवघड कामे स्वतः हाती घेऊन पूर्ण करावी. सभोवतालच्या लोकांना बरोबर घेऊन कामे करावे. नोकरीत वरिष्ठांच्या वाढत्या अपेक्षांना तोंड देताना कष्ट फार पडतील. पैशाची तजवीज करून ठेवावी. प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी.

धनू ः कामे मार्गी लागल्याने कामाचा हुरूप वाढेल. व्यवसायात अशक्‍य वाटणाऱ्या कामातही चांगली प्रगती होईल. कष्ट व प्रयत्न यांची योग्य सांगड घालून नवीन कामे हाती घेतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात प्रोत्साहन देतील. जादा काम करून वरकमाई करता येईल. भविष्यात उपयोगी ठरणारी ध्येयधोरणे आखावी. प्रकृतीमान सुधारेल.

मकर ः मनाप्रमाणे वागता येईल. त्यामुळे थोडेसे स्वास्थ्य अनुभवाल. व्यवसायात कामाचे वेळी कामं करून इतर वेळी आराम करण्यावर भर राहील. ताणतणाव कमी झाल्याने हायसे वाटेल. कामे आटोक्‍यात येतील. नोकरीत सहकाऱ्यांवर फारसे विसंबून राहू नये. घरात सुवार्ता कळेल. मुलांकडून अपेक्षित यश कळेल. महिलांना मानसिक समाधान मिळेल.

कुंभ ः तुम्ही कृतिशील बनावे.. त्यामुळे कामातील प्रगतीचा आलेख चढता राहील. व्यवसायात नवीन योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न राहील. आव्हाने स्वीकारून कष्टप्रद कामे पूर्ण कराल. नोकरीत कामानिमित्ताने प्रवासयोग संभवतो. कमी श्रमात जास्त यश मिळवण्यासाठी सहकारी व वरिष्ठांची मदत लाभेल. कामासाठी नवीन संधी चालून येतील.

मीन ः मनोबल उंचावणारे ग्रहमान आहे. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तींची साथ मिळेल. पूर्वी ज्यांनी विरोध केला होता, त्यांच्याकडून सहकार्य मिळेल. खेळत्या भांडवलाचीही सोय होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्‍वास बळावेल. नोकरीत मतलब साध्य करून घेण्यासाठी कामे कराल. घरात नवीन खरेदीचे योग येतील. तरुणांना दोनाचे चार हात करावेसे वाटतील.

संबंधित बातम्या