यूपीएससी : आव्हानात्मक संधी

तुकाराम जाधव, संचालक, द युनिक ॲकॅडमी
बुधवार, 30 मे 2018

करिअर विशेष
 

केंद्र लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०१७ या परीक्षेच्या २७ एप्रिल २०१८ रोजी जाहीर केलेल्या अंतिम निकालात महाराष्ट्रातील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. त्यातील एक लक्षणीय बाब म्हणजे, पहिल्या १०० गुणानुक्रमांत महाराष्ट्रातील सुमारे १२ विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे. या विद्यार्थ्यांनी अभ्यासाची केलेली नियोजनबद्ध आखणी, अभ्यासातील सातत्य आणि नावीन्य, अद्ययावत संदर्भाचा तसेच सराव चाचण्यांचा आधार आणि स्वयंमूल्यमापनाची हातोटी या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे हे यश प्राप्त केले आहे. 

भारतीय लोकशाही व्यवस्थेतील राज्यकारभाराची प्रत्यक्ष जबाबदारी सांभाळणारा स्थायी घटक म्हणून ‘सार्वजनिक प्रशासन’ मध्यवर्ती ठरते, यात शंका नाही. देशाच्या कारभारात स्थायित्व, सातत्य व निरंतरता याची हमी देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रशासकीय सेवकांवर सोपवलेली असते. म्हणूनच संविधानकर्त्यांनी राज्यघटनेतच या प्रशासकीय सेवकांच्या निवडीसाठी केंद्रपातळीवर आणि राज्यपातळीवर स्वतंत्र आयोगाची तरतूद केली आहे. हा आयोग दरवर्षी सुमारे २० प्रकारच्या ‘गट अ’ आणि ‘गट ब’ पदांच्या भरतीसाठी परीक्षांचे आयोजन करतो. ही पदे प्राप्त झालेले अधिकार, नोकरीची हमी, सन्मानजनक वेतन आणि सुविधा तसेच समाजासाठी सकारात्मक हस्तक्षेप करण्याची संधी इत्यादी कारणांमुळे ही सेवा पदे विद्यार्थ्यांना सतत खुणावत असतात. अर्थात, या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध, समग्र आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज असते. 

यूपीएससी परीक्षेचे वेगळेपण 
यूपीएससी ही एक स्पर्धात्मक परीक्षा आहे. यात यश मिळवण्यासाठी यूपीएससी परीक्षेचे स्वरूप, त्यातील पूर्व, मुख्य, मुलाखत हे टप्पे, त्यांचा अभ्यासक्रम, त्यासाठी आवश्‍यक संदर्भ-साहित्य आणि महत्त्वाचे म्हणजे परीक्षेची अभ्यासपद्धती याविषयी वस्तुनिष्ठ माहिती मिळविणे गरजेचे ठरते. म्हणूनच या परीक्षेचा विचार करताना प्रथमतः यूपीएससी परीक्षेचे स्पर्धा परीक्षा म्हणून असणारे वेगळेपण लक्षात घ्यावे लागते. यासंदर्भात पुढील बाबी लक्षात घेता येतात. एकतर या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी इतर परीक्षांप्रमाणे पात्रतेची कोणतीही पूर्व निर्धारित अट (३५% अथवा ४०%) ठरविलेली नसते. त्या त्या वर्षी आयोगाद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांच्या विशिष्ट प्रमाणातच या परीक्षेत विद्यार्थी पात्र ठरविले जातात. स्वाभाविकच परीक्षेला बसलेल्या इतर विद्यार्थ्यांना मागे सारून पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुरू होते आणि जाहिरातीत नमूद केलेल्या संख्येएवढेच विद्यार्थी अखेरीस यशस्वी ठरतात. दुसरे म्हणजे, ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची पूर्व परीक्षा; लेखी स्वरूपाची मुख्य परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची तपासणी करणारी मुलाखत अशा तीन निरनिराळ्या टप्प्यांनी बनलेली असते. यासंदर्भात हे लक्षात घेतले पाहिजे, की रूढ परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मुलाखतीसारख्या चाचणीला सर्वसाधारणतः सामोरे जावे लागत नाही. याउलट मुलाखत हा स्पर्धा परीक्षेतील महत्त्वाचा घटक आहे. तिसरे वेगळेपण म्हणजे, या परीक्षेचा व्यापक अभ्यासक्रम. यात एक वैकल्पिक विषय, सामान्य अध्ययनाचे चार पेपर्स आणि निबंधाच्या स्वतंत्र पेपरचा समावेश होतो. 

या परीक्षेचे आणखी एक वेगळेपण म्हणजे सामान्य अध्ययन तसेच वैकल्पिक विषयांतील महत्त्वपूर्ण प्रकरणांशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास विद्यार्थ्याला करावा लागतो. वर्तमान पत्रे, मासिके, नवीन संदर्भ ग्रंथ याद्वारे विद्यार्थ्याला आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे लागते. शेवटी, अत्यंत ‘गतिशील’ स्वरूप हे या परीक्षेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. एकंदरच शब्द व वेळेची मर्यादा, इतरांशी असणारी स्पर्धा यामुळे या परीक्षेचा प्रत्येक टप्पा विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारा ठरतो. यूपीएससी परीक्षेच्या तयारीचा आरंभ करताना हे वेगळेपण लक्षात घेऊनच विद्यार्थ्याला या परीक्षेसाठी आवश्‍यक साधनांची जमवाजमव करावी लागते. 

यूपीएससीचे स्वरूप व व्याप्ती 
यूपीएससी परीक्षेचे स्पर्धात्मक परीक्षा म्हणून असणारे वेगळेपण लक्षात घेतल्यानंतर पुढील पायरी येते ती यातील पूर्व, मुख्य व मुलाखत या तिन्ही टप्प्यांचे स्वरूप सूक्ष्म व सखोलपणे लक्षात घेण्याची! पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन (२०० गुण) आणि नागरी सेवा कलचाचणी (२०० गुण) या दोन विषयांचा समावेश होतो. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१३ मध्ये स्वीकारलेल्या नव्या बदलानुसार यूपीएससी मुख्य परीक्षा १७५० गुण आणि मुलाखतीस २७५ गुण निर्धारित करण्यात आले आहेत. जुन्या पद्धतीप्रमाणेच भारतीय भाषेचा (३०० गुण) आणि अनिवार्य इंग्रजी (३०० गुण) हे भाषेचे दोन पात्रता पेपर नव्या पद्धतीत कायम ठेवण्यात आले आहेत. स्वाभाविकच या बदलांचा सर्वांगीणपणे विचार करून आपली अभ्यासपद्धती निर्धारित करणे अत्यावश्‍यक आहे. 

 मुख्य परीक्षेतील पहिला पेपर निबंधाचा पेपर होय. आयोगाने यास २५० गुण निर्धारित केले आहेत. आयोगाने दिलेल्या दोन विभागांतील एकूण आठ विषयांपैकी कोणत्याही दोन विषयांवर निबंध लिहिणे अपेक्षित आहे. सुरवातीपासूनच निश्‍चित वेळ देऊन निबंधाची सातत्यपूर्ण तयारी करणे गरजेचे आहे. त्यासाठी मागील ५-६ वर्षांच्या प्रश्‍नपत्रिकांचे अवलोकन करून आयोगाने आतापर्यंत विचारलेले निबंधाचे विविध विषय लक्षात घ्यावेत. त्यानंतर अभ्यासाच्या सोयीसाठी प्रस्तुत विषयाचे ४-५ प्रमुख शीर्षकाखाली व्यापक वर्गीकरण करावे. उदा. लोकशाही, जागतिकीकरण, स्त्रियांचे समाजातील स्थान, आंतरराष्ट्रीय राजकारण, पर्यावरण इत्यादी. अशारीतीने व्यापक वर्गीकरण केल्यानंतर संबंधित मुद्द्यांविषयी मतमतांतरे, वैचारिक भूमिका, उपाययोजना आणि भवितव्य या धर्तीवर विविधांगी माहितीचे संकलन करावे. त्यानंतर स्वतःच विषय तयार करून निबंध लिहून तपासून घ्यावा. 

मुख्य परीक्षेचा आराखडा 
पात्रता पेपर 
    पेपर अ     - भारतीय भाषा   - ३०० गुण 
    पेपर ब      - अनिवार्य इंग्रजी - ३०० गुण 

गुणानुक्रमासाठी ग्राह्य धरले जाणारे अनिवार्य विषय 
    पेपर १ - निबंध (२५० गुण) 
    पेपर २ - भारतीय वारसा, संस्कृती इतिहास आणि भारत व जगाचा भूगोल (२५० गुण) 
    पेपर ३ - कारभार प्रक्रिया, राज्यघटना, राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध (२५० गुण) 
    पेपर ४ - अर्थव्यवस्था, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान (२५० गुण) आणि 
    पेपर ५ - नैतिकता, सचोटी व निष्ठा आणि दृष्टिकोन (२५० गुण) 
    पेपर ६ - वैकल्पिक विषय पेपर क्रमांक १ (२५० गुण) 
    पेपर ७ - वैकल्पिक विषय पेपर क्रमांक २ (२५० गुण) 

मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययनाचे महत्त्व वाढल्यामुळे त्यास योग्य वेळ देणे महत्त्वाचे ठरते. सामान्य अध्ययनातील चारही पेपर्समध्ये विविध विषय समाविष्ट करण्यात आले आहेत हे लक्षात घेऊन प्रत्येक विषयाचे स्वतंत्र नियोजन करणे अत्यावश्‍यक आहे. त्या-त्या विषयांतील मूलभूत संकल्पना, माहितीप्रधान आणि तथ्यात्मक भाग आणि चालू घडामोडी अशा तिन्ही घटकांची  पद्धतशीर तयारी करावी. सामान्य अध्ययनासाठी विविध संदर्भ पुस्तके वाचावयाची असल्याने ‘मायक्रो नोट्‌स’चा आधार घेऊन संबंधित साहित्य साररुपाने लिहून काढावे. प्रत्येक विषयाची उजळणी आणि नेमकेपणाने उत्तरे लिहिण्यासाठी ‘मायक्रो नोट्‌स’ अत्यंत उपयुक्त ठरतात. सामान्य अध्ययनातील प्रश्‍नांची उत्तरे अधिक प्रभावी करण्यासाठी समर्पक उदाहरणे, प्रयोग, आकडेवारी, सांख्यिकी यांचा आधार घ्यावा आणि उत्तरांची मांडणी करताना फ्लो चार्ट, पाय चार्ट, नकाशे इत्यादी तंत्रांचा वापर करावा. शेवटी भरपूर सराव चाचण्यांची उकल हा अभ्यासपद्धतीचा मध्यवर्ती भाग असेल याची दक्षता घ्यावी. 

मुलाखत अर्थात व्यक्तिमत्त्व चाचणी हा या परीक्षेचा अंतिम आणि अनेकार्थाने महत्त्वाचा टप्पा होय. त्यासाठी यूपीएससीने २७५ गुण निर्धारित केले आहेत. मुख्य परीक्षा व मुलाखत या दोन्ही परीक्षांमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची बेरीज करूनच विद्यार्थी पात्र वा अपात्र ठरवला जातो. त्यामुळे मुलाखत हादेखील महत्त्वाचा टप्पा ठरतो. आयोगाने मुलाखतीऐवजी ‘व्यक्तिमत्त्व चाचणी’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक उपयोजिला आहे. यासाठी विद्यार्थ्याची व्यक्‍तिगत माहिती (नाव, आई-वडिलांचे नाव, आडनाव); गाव, तालुका, जिल्हा, विभाग व राज्याची माहिती; शिक्षण (शालेय, महाविद्यालयीन व पदवी); वैकल्पिक विषय; चालू घडामोडी व विद्यार्थ्यांच्या अभ्यासबाह्य छंद-आवडी, क्रीडा, सामाजिक सेवेतील रस या घटकांची तयारी करणे क्रमप्राप्त ठरते. वास्तविक, मुलाखतीत विद्यार्थ्याच्या ज्ञानापेक्षा त्याचे समकालीन वास्तव, त्यातील घडामोडी व कळीचे मुद्दे याविषयक दृष्टिकोन व भूमिका तपासली जाते. विद्यार्थ्याला समकालीन बाबींची जाण तर असलीच पाहिजे, परंतु याचबरोबर त्याची स्वतःची भूमिकादेखील स्पष्ट असावी लागते. विद्यार्थी समन्यायी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी, संतुलित विचार करणारा आहे किंवा नाही हे पाहिले जाते. अर्थात विद्यार्थ्याची देहबोली, भाषा, संवाद कौशल्य, विचारांतील स्पष्टता, आत्मविश्‍वास या बाबीही मुलाखतीत महत्त्वाच्या ठरतात. स्वाभाविकच भरपूर वाचन, विविध मुद्यांचे सर्वांगीण आकलन, त्याविषयक स्वतःचे ठाम मत विकसित करणे महत्त्वपूर्ण ठरते. बोलण्याचा भरपूर सराव, गटचर्चा व अधिकाधिक मॉकइंटरव्हूजद्वारे मुलाखतीची तयारी करता येते. 

अभ्यास धोरण 
पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांनी बनलेल्या व व्यापक अभ्यासक्रमावर आधारित या परीक्षेचे स्वरूप सविस्तरपणे लक्षात घेतल्यानंतरच या परीक्षेच्या तयारीला खऱ्या अर्थाने सुरवात होते. या तयारीच्या प्रारंभीच काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेणे अत्यावश्‍यक ठरते. मुख्य परीक्षेत घ्यावयाच्या वैकल्पिक विषयाची निवड महत्त्वपूर्ण ठरते. योग्य मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन, स्वतःचा रस लक्षात घेऊन ही निवड करावी. संबंधित वैकल्पिक विषयातील आपला रस, स्वतःची पदवी शिक्षणाची पार्श्‍वभूमी, त्या विषयाच्या मार्गदर्शनाची उपलब्धता, त्यावर उपलब्ध दर्जेदार व अद्ययावत संदर्भ साहित्य या बाबींचा विचार वैकल्पिक विषयांची निवड करताना अगत्याचा ठरतो. यूपीएससीत राज्यशास्त्र, लोकप्रशासन, मानववंशशास्त्र, भूगोल, इतिहास, समाजशास्त्र हे विषय अग्रक्रमाने निवडले जातात व ९० टक्के विद्यार्थी याच विषयांना पसंती देतात. 

वैकल्पिक विषयाची निवड ठरल्यानंतर सर्व अभ्यास-विषयांचा अभ्यासक्रम बारकाईने पाहावा. अभ्यासक्रम बारकाईने पाहिल्यानंतर विविध विषयांवरील दर्जेदार व अद्ययावत संदर्भसाहित्य मिळवावे. काही मूलभूत, संकल्पनात्मक व महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ इंग्रजीतूनच वाचावेत. त्याचे मराठीत योग्य भाषांतर झालेले असल्यास ते उपयोगात आणावे. यानंतर यूपीएससी परीक्षांच्या मागील किमान १० प्रश्‍नपत्रिकांचे सूक्ष्मपणे विश्‍लेषण करावे. या परीक्षांच्या अभ्यासात प्रश्‍नपत्रिकांच्या विश्‍लेषणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, त्या माध्यमातूनच अभ्यासाची दिशा निर्धारित करून त्यात नेमकेपणा आणता येतो. प्रश्‍नांच्या विश्‍लेषणाद्वारे प्रश्‍नांचे स्वरूप, त्यात होणारे बदल, त्या-त्या विषयातील महत्त्वाची प्रकरणे, संदर्भ साहित्याची पर्याप्तता या बाबी लक्षात घ्याव्यात. 

माध्यमाची निवड हा देखील अनेकांसाठी त्रासदायक व गुंतागुंतीचा विषय ठरतो. प्रथमतः हे लक्षात घेतले पाहिजे, की मराठी माध्यमातूनही (इतर भारतीय भाषांप्रमाणेच) ही परीक्षा देता येते. इंग्रजी माध्यमातून परीक्षा दिल्यानंतर चांगले गुण मिळतात, असा  व्यापक स्तरावर गैरसमज आढळतो. परंतु, अनेक विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून परीक्षा देऊन यश मिळवले हे वेगळे सांगणे नको. वास्तविक, प्रश्‍नाला अनुसरून योग्य परिभाषेचा अवलंब करून, उत्तरात सर्व मुद्दे समाविष्ट केल्यास कोणत्याही भाषा माध्यमातून चांगले गुण प्राप्त करता येतात, हे उघड आहे. मराठी माध्यमातून अनेक विषयांवर दर्जेदार व अद्ययावत संदर्भ साहित्य उपलब्ध नाही, हे वास्तव आता मागे पडत आहे. त्यामुळे आपल्याला ज्या भाषेतून उत्तम पद्धतीने अभिव्यक्‍त करता येते, ती भाषा माध्यम म्हणून निवडावी. 

अभ्यास व वेळेचे नियोजन 
यूपीएससीसाठी लागणारी ही प्राथमिक जमवाजमव केल्यानंतर अभ्यास व वेळेचे नियोजन मध्यवर्ती ठरते. पूर्व व मुख्य परीक्षेत अनेक विषयांचा अभ्यासक्रम विविध गुणांसाठी दिलेला असल्याने त्यांचे परीक्षेतील महत्त्व व त्यासाठी वाचावी लागणारी पुस्तके, अभ्यास विषयातील स्वतःची गती व रस या बाबी लक्षात घेऊन घटकवार अभ्यास व वेळेचे नियोजन करावे. नियोजनाबाबत प्रत्येक विद्यार्थ्याने हे लक्षात घ्यावे, की या परीक्षेच्या योग्य तयारीसाठी किमान १ वर्षाचा (दररोज किमान १०-१२ तास) नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास आवश्‍यक ठरतो. या वर्षभराच्या काळाचे ६, ३, १ महिना; ३०, १५, ७ व १ दिवसाचे सखोल नियोजन ठरवणे महत्त्वाचे आहे. या नियोजनाची विभागणी करताना मुख्य परीक्षेसाठी साधारणतः ८ महिने, पूर्व परीक्षेसाठी ४ महिने द्यावेत. वेळेच्या नियोजनात त्या-त्या विषयांच्या किमान दोन - तीन उजळण्या झाल्या पाहिजेत हे लक्षात घ्यावे. नियोजनाच्या संदर्भात नियोजन केवळ कागदावरच राहणार नाही, तर त्याची सातत्यपूर्ण अंमलबजावणी होईल याची खात्री बाळगली पाहिजे.  

यूपीएससीच्या एकंदर तयारीत पूर्व व मुख्य परीक्षांसाठी भरपूर सराव चाचण्या देणे निर्णायक ठरते. कारण या सरावाद्वारेच आपल्या तयारीची पातळी, त्यातील उणिवा, कच्चे दुवे, वेळेचे नियोजन या बाबी लक्षात घेऊन त्यात वेळीच दुरुस्त्या करता येतात. सराव चाचण्यांद्वारेच उत्तरात अचूकता व नेमकेपणाची हमी देणे शक्‍य होईल. म्हणून सराव चाचण्या विद्यार्थ्यांच्या यशात निर्णायक घटक मानावा लागतो. चालू घडामोडी हा भाग पूर्व, मुख्य व मुलाखत या तिन्ही टप्प्यांत मध्यवर्ती आहे. विशेषतः सामान्य अध्ययनातील बहुतांश प्रश्‍न चालू घडामोडींवर आधारित असतात. राज्यव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान यातील ताज्या घडामोडींविषयी अनेक प्रश्‍न विचारले जातात. त्यामुळे द हिंदू, इंडियन एक्‍स्प्रेस ही वर्तमानपत्रे; फ्रंटलाईन हे पाक्षिक; योजना व ‘युनिक बुलेटिन’ हे मासिक नियमितपणे वाचावे. इंडिया इयरबुक व अद्ययावत संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन हा विषय पक्‍का करावा. दररोज किमान २ तासांचा कालावधी चालू घडामोडींसाठी राखीव ठेवावा. मुलाखतीत तर बरेच प्रश्‍न चालू घडामोडींवर आधारित असतात. म्हणून या विषयाची तयारी सुरवातीपासूनच करावी लागते. 

थोडक्‍यात, यूपीएससी परीक्षेच्या एकंदर तयारीत विद्यार्थ्याने हे नेहमी लक्षात ठेवावे की पूर्व, मुख्य व मुलाखत हे टप्पे भिन्न असले तरी त्याचा अभ्यास समग्र दृष्टिकोनातूनच केला पाहिजे. कारण, या तिन्ही टप्प्यांत अनेक अभ्यासघटकांच्या बाबतीत साम्य आहे आणि यातील प्रत्येक टप्प्याचा अभ्यास इतर टप्प्यांना सहाय्यभूत ठरणाराच आहे. म्हणून पूर्व, मुख्य, मुलाखत असा सुटा-सुटा, विखंडित अभ्यास न करता त्यातील साम्य लक्षात घेऊन समग्रपणे अभ्यास करावा. शेवटी, परीक्षेचे योग्य आकलन, दर्जेदार व अद्ययावत संदर्भ ग्रंथांचा अवलंब, योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास व वेळेचे नियोजन याद्वारे सर्वसामान्य विद्यार्थीदेखील या परीक्षेत देदीप्यमान यश मिळवू शकतो. तथापि, त्यासाठी गरज आहे ती निर्धार, जिद्द, चिकाटी याबरोबरच अभ्यासातील सातत्य व परीक्षाभिमुखता याची! 
(admin@theuiqueacademy.com

फोटो फीचर

संबंधित बातम्या