ग्रहमान : १६ ते २२ डिसेंबर २०१७

अनिता केळकर
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

१६ ते २२ डिसेंबर २०१७
 

मेष 
व्यवसायात अडीअडचणींवर मात करून यश मिळवाल. कामात आवश्‍यक ते बदल करून उलाढाल वाढवण्याचा विशेष प्रयत्न राहील. जुनी वसुली होईल. मात्र ती करताना इतरांशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्यावी. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा सवलत व अधिकारही देतील. सहकाऱ्यांशी गोड बोलून कामे करून घ्यावीत. घरात कामाचा पसारा वाढवून नका. प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. 

वृषभ 
विरोधकांवर मात करून पुढे मार्गक्रमण कराल. व्यवसायात म्हणावी तशी साथ नसेल. तरीही सकारात्मक दृष्टिकोन राहील. सहज सोप्या वाटणाऱ्या कामात अडथळे येतील. स्वयंसिद्ध राहून कामे उरकावीत. नोकरीत कितीही काम केले तरी समाधान नसेल. त्यामुळे निराशा येईल. परंतु कामात मग्न राहावे. अनपेक्षित चांगली वार्ता कळेल. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. घरात प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. रागलोभाचे प्रसंग येतील. शांत राहावे. 

मिथुन 
कामात चांगली कलाटणी मिळाल्याने उत्साह वाढेल. व्यवसायात स्वतःच्या मर्यादा ओळखून नवीन योजनांचा विचार करावा. पैशाची तजवीज होईल. नोकरीत ऐकावे जनाचे करावे मनाचे या मंत्राचा उपयोग होईल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. मनाजोगती कामे होतील. घरात मुलांच्या प्रगतीबाबत चांगली बातमी कळेल. कामाचा उरक दांडगा असेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ग्रहमान लाभेल. 

कर्क 
ग्रहमान अनुकूल राहील. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण करावीत. उलाढाल वाढेल. तसेच जुनी येणीही वसूल होतील. मानसिक शांतता मिळेल. नोकरीत सहज सोपी कामे सोपवली जातील. केलेली कामे कौतुकास पात्र ठरतील. शेअर्स किंवा नवीन फंडामध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात लाभदायी ठरेल. घरात नवीन वाहन जागा खरेदीचे योग येतील. मुलांकडे लक्ष द्यावे लागले. तरुणांनी अतिधाडस करू नये. 

सिंह 
महत्त्वाकांक्षा जागृत होईल. त्यामुळे नवीन धाडस कराल. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामात फायद्याचे प्रमाण वाढेल. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत योग्य व्यक्तींची साथ मिळेल. मनातील इच्छा आकांक्षा सफल होतील. जुनी येणी वसुली होईल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात वातावरण चांगले राहील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील . तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. सामूहिक क्षेत्रात चांगली कामगिरी घडेल. 

कन्या
एकाच वेळी घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात ग्रहांची मर्जी राहील. त्यामुळे चांगल्या घडामोडी घडतील. कामात प्रगती चांगली होईल. कामाचा उरक दांडगा राहील. त्यामुळे दगदग धावपळ होईल. आर्थिक चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठांच्या सूचना पाळाव्या लागतील. त्यामुळे चिडचिड होईल. मनाविरुद्ध वागावे लागेल. मात्र रागाच्या भरात कुसंगत धरू नका. घरात अनपेक्षित खर्च वाढतील. पाहुण्यांची ये जा राहील. विवाह, वास्तुशांती इत्यादी कार्यक्रम पार पडतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. 

तूळ
कामाचे महत्त्व ओळखून त्याप्रमाणे कामाचे नियोजन करावे. व्यवसायात योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करावी. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे लक्ष द्यावे. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. नोकरीत सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येईल. कामात गुप्तता राखावी. 
विचार व बेत यांची मांडणी योग्य हाताळा. घरात अंथरूण पाहून पाय पसरावे. कर्ज काढून गृहसजावट करू नये. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. 

वृश्‍चिक
मानलं तर समाधान मिळेल. व्यवसायात लांबलेली कामे मार्गी लागतील. पैशाची चणचण दूर होईल. चिंता कमी होऊन प्रश्‍नांची उकल होईल. परंतु फार मोठे धाडस मात्र नको. नोकरीत चांगली घटना तुमचे लक्ष वेधेल. वरिष्ठ दिलेले आश्‍वासन पाळतील. कामानिमित्ताने प्रवासयोग येतील. घरात शुभकार्य ठरतील. समारंभासाठी पैशाची तजवीज करावी लागेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता टिकवावी. 

धनू
संमिश्र ग्रहमान राहील. एक चांगली तर एक मनाविरुद्ध घटना घडेल. व्यवसायात पैशाची आवक चांगली राहील. जुनी येणीही वसूल होतील. नवीन कामे मिळतील. प्रगतीसाठी नवीन गुंतवणूक कराल. नोकरीत मोठ्या कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. त्यासाठी अधिकारही देतील. जोडधंद्यातून लाभ होईल. नवीन ओळखीचा उपयोग होईल. घरात आपल्याच माणसांचा विचित्र अनुभव येईल. रागावर नियंत्रण ठेवावे. प्रकृतीची हेळसांड करू नका. मुलांच्या प्रगती बाबत निश्‍चिंत राहावे. 

मकर
सध्या तुमचा आत्मविश्‍वास बळावला आहे. त्यामुळे धाडस करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात सहज सोप्या वाटणाऱ्या कामात अडथळे येतील. परंतु निराश न होत अथक श्रमाने यश संपादन कराल. पैसे व वेळ यांची योग्य सांगड घालून कामाचे नियोजन केलेत तर लाभ होईल. नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करावे. भावनेच्या भरात उधारउसनवारी टाळावी. कर्तव्यपूर्तीला प्राधान्य राहील. घरात सहजीवनाचा आनंद घ्यावा. मुलांच्यासाठी पैसे खर्च करावे. मानसिक समाधान राहील. 

कुंभ
कल्पनेला वास्तवतेची जोड मिळेल. व्यवसायात मनोकामना पूर्ण होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. फायदा मिळवून देणाऱ्या कामांकडे लक्ष द्यावे. पैशाची तजवीज होईल. नोकरीत कोणत्याही कामात बेफिकीर राहू नका. वरिष्ठांची एखादी गोष्ट जरी पटली नाही तरी विरोध करू नका. घरात किरकोळ कारणावरून वादविवाद होतील. दुर्लक्ष करावे. प्रियजनांच्या जीवनातील आनंदाचे क्षणात सहभागी व्हाल. तरुणांचे विवाह ठरतील. 

मीन
ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल वाढवावी. चिकाटी, जिद्द यांचे जोरावर कामे मिळतील. नोकरीत कामाचा वेग उत्तम राहील. कामात प्रगतीचे मार्ग खुले होतील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. घरात आनंद देणारी चांगली घटना घडेल. तरुणांचा उत्साह वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पोषक वातावरण मिळेल. प्रकृतीमान सुधारले. 

संबंधित बातम्या