सफर अनुभवा पाणबुडीची

शिवप्रसाद देसाई
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर-कोकण विशेष   
 

सिंधुदुर्गातील सागराच्या पोटात स्वर्गीय सौंदर्य लपलेले आहे. हे सौंदर्य पर्यटकांसाठी खुले होईल. ‘निवती रॉक’ येथे भारतातील पहिली पर्यटनासाठीची पाणबुडी लवकरच दाखल होणार आहे. अंडरवॉटर टुरिझममधील हा मैलाचा दगड ठरेल. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात खरेतर अकरा वर्षांपूर्वी मालवण, तारकर्ली भागात स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून अंडरवॉटर टुरिझमची सुरवात झाली. सध्या ही इंडस्ट्री वर्षाला सुमारे शंभर कोटींची उलाढाल करीत असून, त्यात वाढ होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या पुढचा टप्पा म्हणून निवती रॉक (ता. वेंगुर्ले) येथे ३० पर्यटकांना वाहून नेता येईल इतक्‍या क्षमतेची बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी आणण्याच्या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद केल्याने वेंगुर्ले परिसरातील पर्यटनाला मोठी उभारी मिळेल.

सिंधुदुर्गातील समुद्राखालचे विश्‍व हे जैवविविधतेने नटलेले आहे. वेंगुर्ले-निवतीपासून विजयदुर्गपर्यंत समुद्राच्या खाली अनेक प्रकारची प्रवाळे, दुर्मिळ मासे यांचा खजिना आहे. काही ठिकाणी खडकाळ भाग आहे. तेथे अनोखे जैवविश्‍व आहे. या प्रकल्पासाठी निवडलेला ‘निवती रॉक’ हा पूर्ण किनारपट्टीवर सर्वाधिक आकर्षण ठरेल, असा भाग आहे. वेंगुर्ले आणि निवती येथून या ठिकाणी बोटीतून पोचायला ३० ते ४० मिनिटे लागतात. या ठिकाणी खडकांची तीन ते चार बेटे आहेत. पोर्तुगीजांनी या ठिकाणी जलवाहतुकीच्या सोयीसाठी दीपगृह उभारली होती. याची नोंद जलवाहतुकीच्या जागतिक नकाशात कायम राहील. 

सुनामीमुळे हे दीपगृह उद्‌ध्वस्त झाले होते. त्याचे अवशेष आजही त्या ठिकाणी आहेत. नंतर ब्रिटिशांनी जवळच्या दुसऱ्या खडकाळ बेटावर सध्या कार्यरत असलेले दीपगृह उभारले. याच्या बाजूला आणखी एक खडकाळ गुहांचा भाग आहे. तेथे काही वर्षांपूर्वी ‘स्विफ्ट’ पक्ष्यांच्या घरट्यांच्या तस्करीचा प्रकार उघड झाला होता. हा भाग वरून जितका गूढ आणि सुंदर दिसतो त्यापेक्षा कित्येक पटींनी सुंदर यातील समुद्रविश्‍व आहे.

येथील समुद्राच्या पोटातील भाग वेगवेगळ्या आकाराचे खडक, गुहा यांनी भरलेला आहे. सूर्याची किरणे पोचताच तिथपर्यंत असलेले सागरी जैववैविध्य स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे अनेक प्रकारचे रंगीबेरंगी मासे आहेत. यात शार्क, बटरफ्लाय फिश, स्नॅपर्स, बाराकुडा, ग्रुपर आदींचा समावेश आहे. विविध प्रकारची शैवाले, प्रवाळे आहेत. हा भाग सागरी गजबजाटापासून दूर असल्याने येथील समुद्रविश्‍व अत्यंत समृद्ध आहे.

या प्रकल्पात पर्यटक पारदर्शक पाणबुडीच्या आत असतील व थेट समुद्राच्या विश्‍वात प्रवेश करतील. यामुळे समुद्राचे वास्तविक रूप, सौंदर्य अनुभवता येईल. या जोडीनेच पाणबुडीमधून प्रवासाचा अनुभवसुद्धा आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा असणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री दीपक केसरकर आग्रही होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग ॲण्ड ॲक्वेटिक स्पोर्टस (इस्दा) या संस्थेने यासाठीचा अभ्यास केला. या प्रकल्पासाठी साधारण ४९ कोटी इतक्‍या अंदाजित खर्चाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. यात मदरशिप, बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी (सबमरीन), पॅसेंजर ट्रान्स्फर बोट आणि धक्का अशा चार गोष्टी केल्या जाणार आहेत. या प्रकल्पातील बॅटरी ऑपरेटेड पाणबुडीची क्षमता ३० पर्यटक इतकी असेल. याचा आकार पाणबुडीसारखाच असून, ती पारदर्शक असणार आहे. आत बसून बाहेरचे विश्‍व न्याहाळता येईल. पुढील आठ ते नऊ महिन्यांत हा प्रकल्प साकारला जाणार आहे. 

समुद्रातील अद्‌भुत जग...
पाणबुडी पर्यटनाची सुरवात वेंगुर्लेतून होणार आहे. येथून पर्यटकांना एक सुसज्ज बोट निवती रॉकच्या दिशेने घेऊन जाईल. हे अंतर ३० ते ४० मिनिटांचे असून, या प्रवासात डॉल्फिन दर्शन, सागरी सफर आणि समुद्रातील अद्‌भुत नजारे अनुभवता येणार आहेत. निवती रॉकजवळ पोचल्यावर तेथे वेटिंग पिरियड असणार आहे. या काळात त्या भागातील दीपगृह व परिसर न्याहाळता येईल. ३० पर्यटक क्षमतेची बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी समुद्राच्या खाली असेल. ती साधारण पाणबुडीच्या आकाराची बससारखी असेल. त्याच्या बाजूला मदरशिप असेल. येथून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक खबरदारी घेण्याबरोबरच चार्जिंग व इतर व्यवस्था पुरवली जाईल. पॅसेंजर ट्रान्स्फर बोट पर्यटकांना या पाणबुडीपर्यंत घेऊन येईल. यानंतर पाणबुडी समुद्राच्या पोटातील जैवविविधता दिसेल, अशा पद्धतीने फिरणार आहे. याचवेळी स्कूबा डायव्हिंग करणारे सहकारी माशांना या पाणबुडीच्या परिसरात खाद्य टाकतील. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण मासे पर्यटकांना जवळून न्याहाळता येतील. शिवाय, पाण्याखालील प्रवाळ, शैवाल व इतर वनस्पती जवळून पाहता येणार आहेत. सर्व वयोगटातील पर्यटक याचा लाभ घेऊ शकणार आहेत. यात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्‍यक ती सगळी काळजी घेतली जाणार आहे.

दृष्टिक्षेप

  • प्रकल्पासाठीचा अंदाजित खर्च : ४९ कोटी
  • बॅटरी ऑपरेटेड पाणबुडीची पर्यटक क्षमता : ३०
  • प्रकल्पासाठी आवश्‍यक गोष्टी : मदरशिप, पाणबुडी, पॅसेंजर ट्रान्स्फर बोट, धक्का
  • प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याचा कालावधी : आठ ते नऊ महिने

फोटो फीचर

संबंधित बातम्या