ग्रहमान : ( ५ ते ११ मे )

अनिता केळकर
गुरुवार, 3 मे 2018

ग्रहमान

मेष ः अडी-अडचणी, अडथळे यावर मात करून प्रगती साधाल. जिद्द व आत्मविश्‍वास यांच्या जोरावर यश मिळवाल. व्यवसायात कामांना गती द्याल. रेंगाळलेली कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्याचा चंग बांधाल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची साथ मिळेल. जादा कामाची तयारी असेल तर अर्थप्राप्ती चांगली होईल. घरात महिलांना त्यांच्या क्षेत्रात प्रावीण्य दाखविता येईल. नवीन खरेदीचे बेत पार पडतील. कलाकार, खेळाडूंनी यशप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढेल. 

वृषभ ः कर्तृत्वाला यशाची झालर मिळेल, त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दगदग धावपळ वाढेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागले. नोकरीत महिलांना त्यांचे कार्यक्षेत्र व घर या दोन्हीकडे लक्ष देणे जड जाईल, पण वेळेचे व कामाचे योग्य नियोजन करून त्या यशस्वी होतील. पैशाचा उपयोग योग्य कारणासाठीच व्हावा हा अट्टहास असेल. घरात आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. महिलांना केलेल्या कष्टाचे सार्थक झाले याचे समाधान मिळेल. 

मिथुन ः नशीब व प्रयत्न यांची सांगड योग्यप्रकारे घालून यश संपादन कराल. त्याला पूरक वातावरणाचीही साथ मिळेल. व्यवसायात अशक्‍यप्राय कामात यश मिळेल. तुमची कामाची उमेद दांडगी राहील. नवीन कामे सर्तक ठेवतील. नोकरीत आवश्‍यक असलेल्या गुणांची कदर वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून होईल. त्यामुळे मूठभर मांस चढेल. परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. घरात गृहकृत्यदक्ष राहाल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीने आनंद होईल. सामूहिक क्षेत्रात मोठी मजल माराल. अनुकूल वातावरणाचा योग्य उपयोग करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. 

कर्क ः कामात चोखंदळ राहून कामे योग्य पद्धतीने हातावेगळी करावीत. व्यवसायात मनोधैर्य उत्तम राखलेत तर बाजी माराला. सकारात्मक दृष्टिकोन उपयोगी पडेल. भरपूर काम करूनही पैशाची चणचण भासेल. नोकरीत कुसंगत धरून वाकडे पाऊल टाकू नये. कामात गुप्तता राखावी. मिळालेल्या संधीचे सोने करावे. आवश्‍यक तेथे वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. घरात गैरसमजुतीने होणारे वाद टाळावेत. विश्रांती घेऊन कामे करावीत. महिलांनी उगीचच पराचा कावळा करून वागू नये. खेळाडू - कलावंतांनी अतिसाहस टाळावे. 

सिंह ः तुमच्या मनाला पटेल - रुचेल त्याप्रमाणेच वागावे. केलेल्या कृतीचे समर्थन करावे. व्यवसायात पैशासाठी कोणतेही कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. मात्र कुसंगत टाळा. सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवावी. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून तुमच्या मागण्या मान्य करून घ्याव्यात. कार्यतत्पर राहून कामे करावीत. घरात पेल्यातील वादळे उठतील व पेल्यातच शमतील. तब्येत सांभाळावी. तरुणांना मनपसंत जीवनसाथी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष लागेल. 

कन्या ः कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नये. व्यवसायात आवक-जावक समसमान राहील. खर्चाचे गणित कोलमडेल तरी महत्त्वाच्या खर्चांना प्राधान्य द्यावे. तात्पुरती पैशाची सोय होईल. नोकरीत हातून चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. अतिविश्‍वास टाळावा. कामातील बेत गुप्त ठेवा. घरात इतर व्यक्तींच्या गरजा भागवूनही त्यांचे समाधान होईलच असे नाही. जुने आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्‍यता, मनन -चिंतन करावे. सामूहिक क्षेत्रात झेपेल तेवढेच काम करावे. 

तूळ ः अंथरूण पाहून पाय पसरा! व्यवसायात यश मिळालेच पाहिजे, हा अट्टहास धरू नये. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कृती करावी. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नये. नोकरीत स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करू नये. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. घरात स्वतःचा हट्टी स्वभाव नडेल. इतरांचे विचारही ऐकून घ्यावेत व मगच तुमचे मत मांडावे. वैचारिक मतभेद मनं कलुषित करेल. सारासार विचारानेच कृती करावी. महिलांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे. 

वृश्‍चिक ः रात्र थोडी सोंगे फार अशी स्थिती तुमची असेल. घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. कामामुळे दगदग धावपळ वाढेल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन ध्येयधोरणे स्वीकाराल. कामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कृती कराल. नोकरीत वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार कामे करावीत. कोणतीही गोष्ट करताना गोंधळून न जाता शांतचित्ताने विचार करावा नाहीतर हातून चूक होण्याची शक्‍यता. घरात जुने वादविवाद पुन्हा डोके वर काढतील. त्यातील मथितार्थ समजून घेऊन निर्णय घ्यावा. तरुणांनी अयोग्य संगत धरू नये. 

धनू ः दिलेला शब्द पाळा. कृती आणि विचार यांच्यात एकवाक्‍यता ठेवावी. व्यवसायात सभोवतालच्या परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. कामात लवचिकता आणून त्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील. अतिविश्‍वास टाळा. पैशाच्या हव्यासापोटी चुकीचे निर्णय घेऊ नये. नुकसान तुमचेच होईल. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. 'आपले काम बरे आणि आपण बरे' हे धोरण उपयोगी पडेल. घरात आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. 

मकर ः योग्य वेळी योग्य व्यक्तींचा उपयोग करून घेऊन कामे मार्गी लावण्यात तुमचा हातखंडा असतो, परंतु या सप्ताहात माणसांची पारख करण्यात तुमची चूक होण्याची शक्‍यता आहे. व्यवसायात जादा आत्मविश्‍वास ठेवू नये. पैशाच्या मोहापायी दूर राहावे. जुनी येणी वसुलीकडे लक्ष द्यावे. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करावे. वरिष्ठांचा मूड बघून तुमच्या मागण्या मांडाव्यात. मनातील बेत प्रत्यक्षात करण्याची तयारी असेल. दगदग धावपळ करू नये. जिभेवर साखर ठेवून इतरांकडून खुबीने कामे करून घ्यावीत. इतरांच्या कामाचे कौतुक करावे. 

कुंभ ः जीवनपद्धती आहे तशीच टिकविण्यासाठी थोडी जास्त धावपळ दगदग करावी लागेल. पैसे मिळवण्यासाठी दुप्पट काम करणे गरजेचे होईल. व्यवसायात नवीन योजना उपक्रम हाती घेऊन त्याप्रमाणे कृती करावी. मात्र त्यातील अटी नियमांचा आधीच विचार करून ठेवावा. नोकरीत सहज वाटणाऱ्या कामात विलंब होण्याची शक्‍यता. कामानिमित्ताने लांब प्रवासाचे योग, नवीन ओळखी होतील. घरात मोठ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे निर्णय घेताना उपयोगी पडेल. 

मीन ः अति सर्वत्र वर्ज्य, असा अनुभव येईल. व्यवसायात हातातील कामे आधी संपवा मगच नवीन कामांकडे वळावे. अडथळ्यांची शर्यत पार करून यश मिळेल. पैसाची स्थिती चांगली राहील. नोकरीत मौनव्रत बाळगा. हितशत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवावे. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामे उरकावी. घरात अनावश्‍यक खर्च होतील. इतर व्यक्तींच्या विचित्र वागण्याचा मनस्ताप होईल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. धीराने वागून कृती करावी.

संबंधित बातम्या